गायत्री देवी: जयपूरचं सिंहासन सांभाळण्यापासून ते घोडेस्वारी, राजकारण, आधुनिक जीवनपद्धती....भारताच्या इतिहासातली विलक्षण राणी!!

लिस्टिकल
गायत्री देवी: जयपूरचं सिंहासन सांभाळण्यापासून ते घोडेस्वारी, राजकारण, आधुनिक जीवनपद्धती....भारताच्या इतिहासातली विलक्षण राणी!!

राजा-राणी यांचे आयुष्य म्हणजे आलिशान गोष्टींची रेलचेल हेच आपल्या डोळ्यापुढे येते. आज ज्या सुखसोयी अब्जावधींना मिळत नाहीत त्या त्यांना सहज मिळत असत. पण काही राजे मंडळी मात्र आपल्या वेगळ्या स्वभावाने इतिहासात उठून दिसतात. राजांची अशी बरीच उदाहरणे देता येतील. पण राण्यांची मात्र मोजकीच उदाहरणे सापडतात. राणी असली तरी एकंदर जीवनात महिला म्हणून त्यांना असणारे दुय्यम स्थान हे यामागील कारण सांगता येईल. पण १०० वर्षांपूर्वी अशीही एक राणी होऊन गेली जिने समाजाची सर्व बंधने झुगारली आणि स्वतःचे आयुष्य मनसोक्त जगले. 

आम्ही जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांच्याबद्दल बोलत आहोत. २३ मे रोजी ठीक १०१ वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला होता. कूचबिहारचे राजे जितेंद्र नारायण आणि इंदिरा राजे हे त्यांचे आईवडील. इंदिरा राजे या बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या कन्या होत्या. गायत्री देवी यांचे शिक्षण लंडनला झाले होते. त्याकाळी त्यांचे आधुनिक जगणे आणि आधुनिक विचार यांची मोठीच चर्चा होत असे. 

१९४० साली त्या जयपूरचे महाराजा सवाई मान सिंग दुसरे यांच्यासोबत लग्नगाठ बांधून जयपूरमध्ये महाराणी म्हणून आल्या. तो काळ असा होता की स्त्रिया समाजाच्या मुख्य धारेपासून लांब होत्या. पण गायत्री देवी यांनी पारंपारिक गोष्टी झुगारून एक नवीन उदाहरण जगासमोर ठेवले.

गायत्री देवी या पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्व होत्या. त्यांचे पती काँग्रेसकडे झुकलेले असून देखील त्या शेवटपर्यंत इंदिरा गांधीं यांच्या विरोधी राहिल्या. त्यांनी १९६२ साली स्वतः लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी इतक्या मताधिक्याने विजय मिळवला की त्याची नोंद थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली. पुढे १९६७ साली देखील त्यांनी विजय मिळवला. इंदिरा गांधी आणि त्यांच्यातला संघर्ष एवढा टोकाचा होता की त्यांना आणीबाणीत ६ महिने तुरुंगवास देखील भोगावा लागला. 

महाराणी गायत्री देवी यांचा घोडेस्वारी हा आवडता छंद होता. त्यांची घोडेस्वारी त्याकाळी चर्चेचा विषय होता. पोलो या अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या खेळात देखील त्या पारंगत होत्या. एक महिला घोडेस्वारी करते, पोलो खेळते ही गोष्ट समाजाला पचायला किती त्रास झाला असेल याचा अंदाज लावता येईल. पण त्यांना मात्र या कशाची पर्वा नव्हती. गायत्री देवी यांच्या ताफ्यात अनेक महागड्या गाड्यांचा समावेश होता. रोल्स रॉयस पासून तर स्वतःच्या एयरक्राफ्टपर्यन्त त्यांच्या श्रीमंतीने कुणाचेही डोळे दिपावेत असा तो थाट होता. त्याकाळी महाग गाड्या या सर्वच राजांच्या ताफ्यात दिसत, पण गायत्री देवी यांना विदेशातील चांगल्या गाड्यांची पारख होती. त्यांनी देशातली पहिली मर्सिडीज बेंज w126 मागवली होती. त्याकाळी देशात अनेक राजे महाराजे असले तरी गायत्री देवी मात्र यासर्व गोष्टींमुळे इतरांपेक्षा उठून दिसत असत.

शिकार हा त्यांचा अजून एक आवडता छंद!!! त्यांच्या शिकारीचे कौशल्य वाखाणण्याजोगे होते. गायत्री देवी या फक्त स्वतःचे छंद पूर्ण करत असत असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. त्यांनी कधीकाळी प्रसिद्ध असलेल्या पण नंतर लुप्त झालेल्या जयपुरी नील मृद्भाण्ड (Blue Pottery) बनविण्याच्या कलेला पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रोत्साहन दिले. याखेरीज जयपूर येथे त्यांनी शाळा सुरू केल्या. १९४३ साली मुलींसाठी हायस्कुल सुरू केले. यावरून त्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव असल्याचे स्पष्ट होते.

 

२९ जुलै २००९ साली गायत्री देवी यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वातून आणि जीवनशैलीतून इतिहासात एक नवीन उदाहरण उभे केले. आधुनिक राणी कशी असावी याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा बारकाईने शोध घ्यायचा झालाच तर A Princess Remembers: The Memoirs of Jaipur हे पुस्तक महत्त्वाचे ठरते.

गायत्री देवी यांना बोभाटातर्फे भावपूर्ण आदरांजली.