कोरोना बाधितांचा बचाव देखील करायचा आहे आणि स्वतःला देखील कोरोना होऊ द्यायचा नाही यासाठी सर्वात उपयुक्त गोष्ट म्हणजे पीपीई किट. पण या पीपीई किट मध्ये अगदी काही मिनिटे जरी घालवली तरी अंग घामाने डबडबलेले पाहायला मिळते. पीपीई किट घालून काम करणारे डॉक्टर आणि इतर फ्रंट लाईन वर्कर किती त्रास सहन करत असतील याबद्दल सर्वांना जाणीव आहे. पण यावर उपाय काय याचा शोध मात्र आजवर घेतला गेला नव्हता.
निहाल सिंग आदर्श नावाच्या विद्यार्थ्याला मात्र पीपीई किट घालून काम करणाऱ्या आपल्या आईचा त्रास बघितला गेला नाही. पठ्ठ्याने यावर उपाय शोधायचे ठरवले आणि थेट थंड पीपीई किट शोधून काढली. निहाल हा मुंबईतील सोमय्या इंजिनिअरिंग कॉलेजला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे.







