जगात शहाणे हाताळायला सोपे, काही प्रमाणात वेडेही; पण अर्धवट माणसांशी व्यवहार करणं, त्यांच्या तावडीत सापडणं महाकठीण. याचाच प्रत्यय त्यावेळी रशियाची जनता घेत होती. याचं कारण होतं त्याकाळी सत्तेवर असलेला त्झारवंशीय दुसरा निकोलस हा रशियन राज्यकर्ता.
दुसरा निकोलस हा त्झार वंशाचा राजा. दिसायला एकदम देखणा. निळ्या डोळ्यांचा, डोळ्यांमध्ये रुबाब, उन्मत्तपणाची झाक असलेला. पण हे सोडलं तर राज्यकारभार करण्यासाठी मात्र तो अजिबात लायक नव्हता. आधीच रशिया एवढा मोठा आणि गुंतागुंतीचा, त्यात या निकोलसकडे धडाडी अशी नव्हतीच. त्याची एकंदर आवड, रुची आणि कर्तबगारी हे सगळंच एखाद्या सर्वसामान्य तरुण रशियन अधिकाऱ्याइतकं साधारण होतं. तो एक निरंकुश सत्ताधारी तर होताच, पण त्याच्या भूमिकेबद्दलचा त्याचा दृष्टिकोनही अतिशय बालिश असा होता. त्याच्या मते त्याला हा अधिकार देवाने बहाल केला होता आणि त्यासाठी तो एकटाच जबाबदार होता.
जोडीला त्याच्यामध्ये आत्मविश्वासाचीही कमतरता होती. त्यामुळेच असेल कदाचित, पण त्याच्यावर त्याच्या बायकोचा प्रचंड प्रभाव होता. ज्या गुणांची त्याच्याकडे कमतरता होती, तेच गुण तिच्यात ठासून भरलेले. त्यामुळे त्याच्या निर्णयांमध्येही त्याच्या बायकोचा- अलेक्झांड्राचा- हस्तक्षेप असे. त्यातूनच त्याच्या राजवटीत देव, धर्म, धर्मगुरू यांचं प्राबल्य वाढलं. अलेक्झांड्राच्या मर्जीतल्या माणसांचं फावलं. या राजाने बायकोच्या नादी लागून हाताखालच्या कित्येक कार्यक्षम अधिकाऱ्यांना काढून टाकलं आणि त्यांच्या जागी स्वतःच्या आणि पर्यायाने बायकोच्या मर्जीतले अधिकारी नेमले. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. त्झार वंशाला आत्तापर्यंत देवत्व बहाल करणारे लोक निकोलसवर नाराज झाले.



