मुंबई पोलिसांचे सोशल मिडिया खाते 'कूल'पणे सांभाळणारी ट्विटर मॅडम- सुंचिका पांडे!!

मुंबई पोलिसांचे सोशल मिडिया खाते 'कूल'पणे सांभाळणारी ट्विटर मॅडम- सुंचिका पांडे!!

इतर माध्यमांची मक्तेदारी लयाला जाऊन समाज माध्यमांचा बोलबाला व्हायला आता एक दशक उलटले आहे. या काळात अनेकांनी पारंपरिक पद्धती सोडत सोशल मीडिया ट्रेंडसचा आधार घेत आपला प्रचार आणि प्रसार केला. यात अगदी मोठे राजकीय पक्ष आणि कॉर्पोरेट कंपन्यादेखील मागे राहिल्या नाहीत. या सर्वांत मात्र सरकारी संस्थांनी देखील सोशल मीडिया ट्रेंड्सचा आधार घेऊन स्वतःला अद्ययावत ठेवले आहे.

पण एखाद्या संस्थेला कितीही वाटत असले तरी तेवढे क्रिएटिव्ह लोक त्यांच्या सोशल मीडिया विभागात असल्याशिवाय त्यांचा 'कूलनेस' दिसून येणे शक्य नसते. मुंबई पोलिसांचे ट्विटर अकाउंटदेखील अशाच एकाहून एक 'कूल' पोस्टींसाठी प्रसिध्द आहे. २०१५ साली मुंबई पोलिसांचा अधिकृत ट्विटरप्रवेश झाला, तेव्हापासून तर आजवर आपल्या भन्नाट पोस्ट्सने मुंबई पोलीस ट्विटर खात्याने लोकांची वाहवा मिळवली आहे. पण या ट्विटरमागे नेमका असा कोणता क्रिएटिव्ह चेहरा आहे, याबद्दल अनेकांना माहिती नाही. सुंचिका पांडे हे त्या पडद्यामागील चेहऱ्याचे नाव आहे. सुरुवातीला पत्रकार असलेल्या सुंचिका यांनी नंतर सोशल मीडिया सल्लागार म्हणून काम सुरू केले. त्यांची ओळख ही 'ट्विटर मॅडम' अशीच आहे.

पांडे यांनी पत्रकारितेचे शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेजमधून पूर्ण केले आहे. त्यानंतर एका स्थानिक टीव्ही चॅनेलसाठी त्यांनी काम केले. क्राईम पत्रकारितेत काही वर्षं काम केल्यावर त्यांनी २०१३ साली पत्रकारिता सोडली. पुढे त्यांनी प्रसिद्ध शो सत्यमेव जयतेच्या सोशल मीडिया मॅनेजमेंटसाठी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम बघितले. या काळात त्यांचे अनेक अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध तयार झाले. बेंगलोर पोलिसांच्या ट्विटर हँडलपासून प्रेरणा घेत त्यांनी मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलसाठी कन्सल्टन्सी करायला सुरुवात केली. त्यांच्या अफलातून कल्पनाशक्तीचा वापर करून त्यांनी मिम्स आणि पॉप कल्चरच्या आधारे मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर जिवंतपणा आणला.

सुंचिका यांनी एका मुलाखतीत या कामासाठी लागणारी मेहनत आणि किती संशोधन करावे लागते याबद्दल सांगितले. त्या सांगतात, "तुमची एक चूक कित्येक वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरवू शकते. ही गोष्ट प्रत्येक पोलीस खात्याला माहिती असते. जेव्हा पोलीस खाते सोशल मीडियावर असते, तेव्हा ते लोकांसाठी असायला हवे. या व्यासपीठावर लोकांना नेमके काय अपेक्षित आहे, याची जाण तुम्हाला असणे गरजेचे असते". सुंचिका यांच्याबद्दल जेव्हा सर्वत्र चांगले बोलले जाऊ लागले, तेव्हा त्यांच्याकडे येणारी कामे देखील वाढली.

त्यांनी कन्सल्टन्सीचे काम करावे म्हणून अनेक ठिकाणाहून त्याना आग्रह होऊ लागला. सध्या त्या त्यांची कंपनी हॅट मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणांचे सोशल मीडिया सांभाळत असतात. यात मुंबई, पुणे, ठाणे यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसचा देखील समावेश आहे. हे सर्व पोलीस खात्यांचे सोशल मीडिया हँडल्स प्रसिद्ध आहेत, याचे बरेचसे श्रेय सुंचिका यांना दिले जाते. पण या सर्वांचे श्रेय त्या पोलीस अधिकाऱ्यांना देतात, जे अविरत मेहनत करत असतात. त्या सांगतात की, "माझा सहभाग हा जास्त नाही, खरे हिरो हे जे पोलीस कर्मचारी ही हँडल्स सांभाळत असतात, तसेच सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना उत्तरे देत असतात."

याच कारणामुळे त्यांना एवढी लोकप्रियता लाभली आहे. सुंचिका या अनेक ठिकाणी आपल्या कंपनीच्या माध्यमातून सोशल मीडियाचा 'कूलनेस' ठेवताना दिसत असतात. याच कारणामुळे इतर कन्सल्टन्सी कंपन्यांपेक्षा त्यांचे वेगळेपण हे उठून दिसत असते.

उदय पाटील