आतापर्यंत अनेक महागडे लग्नसोहळे तुम्ही पाहिले किंवा ऐकले असतील. या मोठ्या लोकांचा थाटमाट तितकाच भव्यदिव्य असतो. नोटाबदलीमुळे सद्या देशातील सामान्य माणूस साध्या २००० रूपयांना महाग झालाय तर दुसरीकडे कर्नाटकातल्या या खाणसम्राटांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी चक्क ५०० कोटी उधळले आहेत !! पाहूया या शाही लग्नाची थोडक्यात झलक..
ब्राह्मिणीच्या लग्नाला तब्बल ५०० कोटींचा खर्च : वाचा स्वर्गीय विवाहसोहळ्याचा थाटमाट..


खाणसम्राट म्हणून ओळख असलेले कर्नाटकाचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांची कन्या "ब्राह्मिणी" हिचा हा विवाह बुधवारी बेंगळुरू पॅलेस ग्राऊंड येथे पार पडला. लग्नाच्या एका पत्रिकेची किंमत होती ७००० रूपये. ही पत्रिका म्हणजे एक एलसीडी स्क्रीन होती ज्यात रेड्डी कुटूंबीय निमंत्रण देताना दिसतात.


या लग्नासाठी २०० कोटी खर्चुन विजयनगर साम्राज्य, तिरुपती देवस्थान, बळ्ळारी शहाराचा भाग आणि, रेड्डी यांच्या घराचे सेट उभे केले होते.

लग्नासाठी वधूने परिधान केलेला पोशाख आहे १७ कोटींचा तर दागिन्यांची किंमत आहे ९० कोटी.

लग्नाला तब्बल ५०,००० पाहुणे उपस्थित होते ज्यात अनेक मोठ्या राजकारणी हस्ती आणि सेलिब्रिटींचा समावेश आहे. या पाहूण्यांचा निवास आणि वाहतूक खर्चही कोटींच्या घरात आहे.

या विवाहासाठी तिरुपती देवस्थानामधील पुजारी बोलावले गेले होते. सोबतच देशभरातील २० पुरोहित आणि ३० धर्मगुरूंनी लग्नाला हजेरी लावली होती

पाहुण्यांच्या स्वागतासाठी खास मुंबईहून मॉडेल्स आणि ब्राझिलमधून नृत्यांगना आणल्या गेल्या होत्या. लग्नाची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी ३००० बाऊन्सर्स आणि ३०० पेक्षा जास्त पोलीस दिमतीला होते.

बेकायदा खाणव्यवसाय प्रकरणी तुरुंगवास भोगलेल्या रेड्डी यांनी या लग्नाचा खर्च भागवण्यासाठी आपली सिंगापूर आणि बेंगळुरू मधील संपत्ती गहाण ठेवली आहे. खाणव्यवसायातून मिळविलेल्या अमाप संपत्तीमुळे जणू अख्ख्या बेळ्ळारी जिल्ह्यावर या रेड्डी बंधूंचं राज्य चालतं. मात्र या लग्न सोहळ्यावरून विविध माध्यमातून उत्कंठावर्धक चर्चा आणि तेवढीच टिकाही होताना दिसतेय.