पश्चिम महाराष्ट्रात आणि कर्नाटकच्या निपाणी-हुपरी या सीमाभागात वसुबारसेच्या दिवशी दिवाळी चालू होते एका वेगळ्याच पद्धतीनं. त्या दिवसापासून घरोघरच्या लक्ष्म्या भल्या पहाटे उठतात, शेणसडा घालतात आणि बघता बघता त्यांच्या अंगणात इवलंसं एक नगरच वसवतात!!!
हे आहे नक्की काय?
बळीराजाची सर्वांना माहित असलेली तीच ती छोटीशी गोष्ट. बळी राजाचं पुण्य खूप झालं. इतकं जास्त की त्याला देवांचा राजा करतील की काय अशी इंद्राला पुन्हा एकदा भीती पडली. त्यानं श्रीविष्णूला साकडं घातलं आणि पुण्यवान बळीला स्थान मिळालं ते पाताळात. त्या बळीचं पूजन जरी बलीप्रतिपदेला होत असलं तरी, त्याचं स्मरण करण्याची ही आगळीवेगळी प्रथा विलक्षणच.
हे आहे शेणाचं बनवलेलं नगर. नगरात असतो बळीराजा, काम करत राहणार्या गौळणी, नगराची वेस आणि वसुबारसेपासून बळीपाडव्यापर्यंत एकेका थराने वाढत जाणारा डोंगर.आधी झोपलेला बळीराजा बनवून नंतर गौळणी बनवायला घेतात. शेणाचा छोटासा गोळा दोन्ही हातात घेऊन त्याला आकार लंबगोल आकार द्यायचा आणि जमीनीवर दाबून बसवायचा. यासाठी शेण थोडंसं घट्ट असावं लागतं. आणि मग त्यांना डोकी आणि हात चिकटवलं की झाली गौळण तयार!!