देशात आणि जगात कोरोनाचा हाहाकार सुरू झाला आणि आपल्याला नवनवीन शब्दांची माहिती होऊ लागली. यातीलच एक शब्द म्हणजे वर्क फ्रॉम होम. आयटीमधल्या लोकांना हा शब्द नवा नसला तरी आता तो देशभर सगळ्यांनाच कळाला. कोरोना काळात अनेकांना जरी काम बंद करून घरी बसावे लागले असले तरी ज्या कंपन्यांचे काम लॅपटॉप/ कॉम्प्युटरवरून करणे शक्य होते त्यांनी लोकांना घरूनच काम करण्याची मुभा दिली. नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तसे लॉकडाऊनही आवरले जाऊ लागले. लोकांना मात्र वर्क फ्रॉम होमची झालेली सवय काय सुटत नाही अशी गत आहे.
जर घरून काम करता येत असेल तर का म्हणून कंपनीत जावे असा रास्त प्रश्न अनेक लोक विचारत आहेत. यात अनेकांना मुंबई-पुण्यासारख्या शहरांवरील भार कमी होईल असेही वाटत होते. या वर्क फ्रॉम होमवर एक देशव्यापी धोरण यावे अशी मागणी अनेक ठिकाणांहून होत होती. याच सर्व गोष्टींचा विचार करत देशातील व्यापार मंत्रालय काही महत्वाच्या लोकांसोबत चर्चा करत होते.




