आजकाल स्मार्टफोनमध्ये स्टोरेज कितीही मोठं असलं तरी कमीच पडतं. फोटो, व्हिडीओ,डॉक्युमेंट, फाइल्स यामुळे लवकरच स्टोरेज फुल्ल होऊन जातं. मग तो डाटा आपण एकतर कंप्युटरवर सेव्ह करतो किंवा एक्सटर्नल हार्डडिस्कवर. पण तेही कधीकधी गडबडीत राहून जातं, कधी कंप्युटर हाताशी नसतो तर कधी हार्डडिस्क जवळ नसते. परिणामी फोनवरचा महत्वाचा डाटा हरवतो किंवा आयत्यावेळी सापडत नाही. असं काही होऊ नये म्हणूनच क्लाऊड स्टोरेज हा उत्तम पर्याय आहे. तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्ही या क्लाउड स्टोरेजवर सुरक्षितरित्या साठवून ठेवू शकता. याचीच आज आपण माहिती करून घेणार आहोत.
क्लाउड स्टोरेज म्हणजे काय?
क्लाउड स्टोरेज सोप्या शब्दात सांगायचे तर ऑनलाईन स्टोरेज. तिथे थोडीशी जागा खास तुमच्यासाठी रिझर्व्ह असते. तिथे तुमचा डेटा हा ऑनलाइन स्टोअर केला जातो. हा डेटा तुम्ही भविष्यात कधीही आणि कुठल्याही डिव्हाईसवरून घेऊ शकता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो पूर्णपणे सुरक्षित ठेवला जातो.
तुम्ही तुमचे फोटो, व्हिडिओ किंवा महत्वाच्या फाइल्स क्लाउड स्टोरेजवर स्टोअर केल्यानंतर कुठूनही त्या परत डाऊनलोड करू शकता. कोणत्याही डिव्हाईसवर पाहू शकता. ज्या अकांऊट रून तुम्ही ते स्टोअर केलंय तो ईमेल आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवून तुमची माहिती तुम्ही परत मिळवू शकता. त्यासाठी खालील setting करा. हे सेटिंग फोननुसार बदलू शकतात, पण गुगल अकाऊंट synchronise करायचे असते हे मुख्य सूत्र लक्षात ठेवा.
१, फोनच्या सेटिंग्ज जा.
२. पासवर्ड आणि अकाऊंटवर टॅप करा.
३. Google अकाऊंट वर क्लिक करा. (इथं कॅलेंडर, कॉन्टॅक्ट्स, इ-मेल असे विविध पर्याय असू शकतात. ते सर्व टिक करा म्हणजेच निवडा)
४. अकाउंट सिंक निवडा.
आता फोनच्या बॅकअपबद्दल बोलूया. ते स्वयंचलितपणे कसे सेट करावे.
- फोनवर सेटिंग्ज उघडा.
- 'सिस्टम'वर क्लिक करा आणि बॅकअपवर टॅप करा.
- 'बॅक अप टू गुगल ड्राइव्ह' वर क्लिक करा.
- एकापेक्षा जास्त खाती असल्यास, बॅकअप घेण्यासाठी कोणतेही एक गुगल खाते निवडा. (नोकरीचे गुगल खाते असल्यास ते निवडू नका, स्वत:चा खाजगी डेटा व्यक्तिगत गुगल खात्यानेच क्लाऊड स्टोरेजवर साठवून ठेवा.)
- आता बॅक अपवर टॅप करा.
हे केल्याने आपल्या फोन स्टोरेजवरील डाटा गुगल अकाऊंटवरून गुगल ड्राईव्हवर सेव्ह होतो. मोबाईल सेटिंग मधील "ऑटोमॅटिक सिंक" हा ऑप्शन नेहमी ऑन(चालू) असावा.

