ओटीटी प्लॅटफॉर्मनी सध्याच्या काळात लोकांना मनोरंजनाची एक वेगळीच मेजवानी दिली आहे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होणाऱ्या वेबसिरीजनी अनेकांना वेड लावले आहे. अमेझॉन प्राईमवरील पंचायतने तर लोकांना इतके वेडे करून सोडले आहे की, प्रेक्षकांनी अगदी चातकासारखी याचा दुसरा भाग रिलीज होण्याची वाट पहिली. या वेबसिरीजचा पहिला सीझन यशस्वी झाल्यावर दुसराही चांगलाच हिट ठरला आहे. यातील उपप्रधान या पात्राने ही सिरीज कमालीच्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. संपूर्ण सिरीजमध्ये हसवणारा उपप्रधान प्रल्हाद पांडे शेवटच्या एपिसोडमध्ये लोकांना अक्षरशः रडवून गेला.
फैसल मलिक यांनी उपप्रधानची भूमिका इतक्या सशक्तपणे पेलेली आहे की, सर्वत्रच फैसल मलिक यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. फैसल मलिक यांच्या नावाचे आता इतके गरुड तयार झाले आहेच तर त्यांची 'रियल' कहाणी पण आमच्या वाचकांना सांगून टाकावीशी वाटते. या सिरीजमध्ये त्यांना जवळच्या लोकांचा मृत्यू सहन करावा लागतो. तसे खऱ्या आयुष्यात देखील त्यांनी मोठा त्रास सहन केला आहे. त्यांचा लहान भाऊ १४ वर्षांचा असताना किडनीच्या आजाराने गेला, तर बहिणीने नापास झाल्यामुळे आत्महत्या केली होती. लागोपाठ कोसळलेल्या या दुखाने कोणीही सामान्य माणूस उन्मळून पडणारच. नियतीने दिलेले हे आघात सहन न न झाल्याने ते व्यसनाच्या आहारी गेले. त्यांच्या व्यसनामुळे पूर्ण कुटुंब त्रासले होते. याचे काय करावे हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता.







