जगातल्या सर्वाधिक प्रमाणात सॉफ्ट ड्रिंक पिणाऱ्या देशांच्या यादीत मेक्सिको या देशाचा समावेश होतो. आणि याच देशात एक असंही राज्य आहे जिथं प्रत्येक माणूस दररोज पाण्यापेक्षाही जास्त कोक पितो! या जाणून घेऊया या अनोख्या राज्याविषयी...
च्यापास किंवा चीयापास असं या राज्याचं नाव आहे. इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोका कोलाचा लोगो रंगवलेल्या इमारती दिसतील, प्रत्येक दुकानात कोका कोलाच्या बॉटल्सनी भरलेली लाल फ्रिज, कोपऱ्याकोपऱ्यावर कोका कोलाची जाहिरात करणारे बोर्ड, आणि हाच लोगो रंगवून फिरणारे ट्रकही दिसतील. वाढदिवस असो किंवा लग्न, अगदी एखादा धार्मिक समारंभही इथे कोका कोलाशिवाय अपूर्ण समजला जातो. इथल्या स्थानिक संस्कृतीमध्ये कोका कोलाला इतकं महत्त्वाचं स्थान मिळालंय की एखाद्या चर्चमध्येसुद्धा तुम्हाला कोका कोलाची बॉटल ठेवलेली बघायला मिळेल. इथल्या लोकांची अशी समजूत आहे की कोकची बॉटल ही आजारी लोकांना बरं होण्यास मदत करते, आणि चांगल्या आत्म्यांनाही हे कोक आवडते.



