एकाने अमेरिकेत चक्क स्वत:चा देशच जाहीर केलाय. त्याचं नाव, लोकसंख्या, ठिकाण, अध्यक्ष हे सगळं काय आहे हे ही जाणून घ्या!!

लिस्टिकल
एकाने अमेरिकेत चक्क स्वत:चा देशच जाहीर केलाय. त्याचं नाव, लोकसंख्या, ठिकाण, अध्यक्ष हे सगळं काय आहे हे ही जाणून घ्या!!

जगात कुठे काय दडले असेल सांगता येत नाही. आता हेच पाहा ना, ‘द रिपब्लिक ऑफ मॉलॉसीया’ हे नाव तुम्ही कधी ऐकले आहे का? नाही ना. खरे तर हे नाव तुम्हीच नाही, तर तुमच्या-आमच्यासारख्या असंख्य लोकांसाठी अपरिचितच असे आहे. हा एक छोटासा देश आहे. छोटा म्हणजे किती छोटा? तर अवघा एक एकर! हा देश आहे कुठे माहितेय? अमेरिकेत!

अमेरिकेत म्हणजे अमेरिका खंडात नव्हे हो, तर युनायटेड स्टेट्समध्येच उत्तर नेवाडाप्रदेशात हा एक एकराचा छोटासा ‘द रिपब्लिक ऑफ मॉलॉसीया’ हा देश आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहे. या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र देश म्हणून युएस किंवा युएन यांनी अजूनही मान्यता दिलेली नाही आणि पुढेही देण्याची शक्यता नाही. खरं तर याला देश म्हणणं हाच मोठा विनोद आहे, पण या देशाच्या राज्यकर्त्याला मात्र आपला हा छोटासा जमिनीचा पट्टा म्हणजे एक स्वतंत्र देशच वाटतो.अगदी दीडशे अडीचशे एकर जमीन असणारे शेतकरीही जिथे स्वतःला आपण एवढ्या मोठ्या भूभागाचा राजा असल्याचे समजत नाहीत, तिथे या राज्यकर्त्याला आपली ही एकरभर जमीन स्वतंत्र का ठेवायची आहे?

तर याबद्दल या देशाचे अध्यक्ष केव्हिन बफ यांची नेमकी काय कल्पना आहे ते पुढे वाचा.

तर, २६ मे १९७७ रोजी या देशाची निर्मिती करण्यात आली आणि १९९८ साली केव्हिन यांनी ही जमीन विकत घेतली. याचे आधीचे नाव होते ग्रँड रिपब्लिक ऑफ व्हाल्डेस्टाइन, मग केव्हिन यांनी याचे नामांतर करून ते ‘द रिपब्लिक ऑफ मॉलॉसीया’ असे केले. आता याच्या नावात जरी रिपब्लिक असले तरी खऱ्या अर्थाने हे एक छोटेसे संस्थान आहे.

कोणत्याही प्रदेशाला एक देश म्हणून मान्यता मिळण्यासाठी त्याच्याकडे निश्चित प्रदेश, स्थिर लोकसंख्या आणि इतर देशांशी व्यवहार करण्यास सक्षम असे शासन असावे लागते. ते केव्हिन यांच्या या देशात आहे का? तर त्यांच्या मते हे सगळे त्यांच्याही देशात आहे. त्यांचा स्वतंत्र झेंडा, पासपोर्ट, चलन, राष्ट्रगीत, पोस्ट आणि चिन्हदेखील आहे. हे सगळे अगदी छोट्याप्रमाणात का असेना, पण आहे.

केव्हिन यांना हा देश आणखी मजबूत करायचा आहे. आपल्या देशातील लोकांना चांगल्या सुविधा पुरवून इतर देशांप्रमाणेच सक्षम बनवायचे आहे. यांचे स्वतःचे नौदलही आहे. त्यात छोट्या बोटी (कायाक्स) समाविष्ट आहेत आणि हे नौदल या देशातील तलावात आपले संचलन करत असते. भविष्यात हे नौदल आणखी मजबूत करण्याचाही केव्हिन यांचा मानस आहे.

त्यांचा स्वतंत्र अवकाश संशोधन प्रकल्पही आहे आणि त्यांनी अनेकदा रॉकेट प्रक्षेपित केली आहेत. सध्या तरी त्यांचं अवकाश संशोधन इथवरच मर्यादित राहिले असले तरी भविष्यात त्यांना स्वर्गाचा शोध घ्यायचा आहे.

लवकरच या देशात औद्योगिक विकासाच्या दृष्टीने मिठाची खाण सुरु करण्यात येणार आहे. या देशातील कैद्यांनाच इथे कामगार म्हणून काम करावे लागेल. या देशात कस्टम ऑफिसदेखील आहे.

रशियाने क्रीमिया प्रांताला स्वातंत्र्य दिल्यानंतर अध्यक्ष केव्हिन यांनी यापासून प्रेरणा घेत या देशातील एका पार्कला स्वातंत्र्य दिले आहे. या बागेत अनेक मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. इथे चित्रपटांचे चित्रिकरणही होते. त्यांच्या वेबसाईटवरून आम्ही त्यांना स्वतंत्र घोषित केले आहे, असे अध्यक्ष केव्हिन सांगतात.

इथला प्रमुख व्यवसाय म्हणजे पर्यटन. बाहेरचे पर्यटक इथे फक्त कपडे खरेदी करण्यासाठी येतात.

केव्हिन स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी युएसच्या एका कंपनीत एचआर म्हणून काम करतात. त्यांच्याकडे युएसचे नागरिकत्वही आहे. खरे तर मॉलॉसीया मधील प्रत्येक नागरीकाकडे असेच दुहिरी नागरिकत्व आहे. या देशाची एकूण लोकसंख्या आहे फक्त ३५. अर्थात यात त्यांनी आपल्या कुत्र्यांचीही गणती केली आहे. तसे तर सध्या या देशात फक्त चारच लोक राहतात. इतर लोक मॉलॉसीयापासून जवळच, पण मॉलॉसीयाच्या बाहेर राहतात. त्यांच्या व्यवसाय आणि नोकरीनिमित्ताने त्यांना आपल्या मातृभूमीपासून दूर राहावे लागत असल्याचे केव्हिन सांगतात.

एचआर म्हणून त्यांची कारकीर्द फार उज्वल नसली तरी या देशाचा अध्यक्ष होण्यात ते धन्यता मानतात. मॉलॉसीया म्हणजे त्यांच्यासाठी स्वर्ग आहे.

या देशातील नागरिक फारच गुणी आहेत. त्यांच्या एकमेकांबद्दल काहीच तक्रारी नसल्याने इथे विशेष काही कायदे लागू करण्याची गरज नसल्याचे केव्हिन म्हणतात. मी इथला हुकुमशाह असलो तरी मी माझ्या नागरिकांच्या आयुष्यात कसलीही ढवळाढवळ करत नाही किंवा त्यांनी काय करावे काय करू नये हेही सांगण्याच्या भानगडीत पडत नाही असे केव्हिन म्हणतात.

तर स्वतंत्र देशाचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला, ते नक्की सांगा.

थांबा, असा स्वत:ला राजे म्हणून दवंडी पिटणारे बरेच लोक जगात आहेत, त्यातले दोन तर भारतीयच आहेत. वाचा जरा त्यांच्याबद्दलही..

 

बलात्कारी बाबा नित्यानंदाने नवा देश बनवला? असं खरंच कुणी करू शकतं??

 बलात्कारी बाबा नित्यानंदाने नवा देश बनवला? असं खरंच कुणी करू शकतं??

फक्त २७ लोकांचा देश - विश्वास बसत नाही ना ? मग पुढे वाचा !!

 फक्त २७ लोकांचा देश - विश्वास बसत नाही ना ? मग पुढे वाचा!!

आणि हा इंदौरचा तरूण झाला इजिप्तजवळच्या प्रदेशाचा राजा!! जाणून घ्या हे कसं काय घडलं..

 आणि हा इंदौरचा तरूण झाला इजिप्तजवळच्या प्रदेशाचा राजा!! जाणून घ्या हे कसं काय घडलं..

लोकांनी असं काहीही केलं तरी जोवर अशा देशांना युएनची मान्यता मिळत नाही तोवर व्हॅटिकन सिटी हाच जगातला सर्वात लहान देश राहणार आहे हे मात्र सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे!!

जाता जाता, एखाद्या देशात दुसरा देश असण्याचंही नवल नाही. क्रिकेटमुळे सर्वांना माहित असलेल्या साऊथ आफ्रिका देशात 'लिसोथो' आणि 'एस्वातिनी किंवा स्वाझिलँड' नावाने ओळखले जाणारे आणि युएनने मान्यता दिलेले दोन देश आहेत हे ही आमच्या वाचकांना निदर्शनात आणून देतो आहोत.

मेघश्री श्रेष्ठी