हायकिंग करताना माणूस एकटा असला तर अनेकवेळा काही दुर्मिळ गोष्टी त्याच्या नजरेस पडल्या तर एकतर तो घाबरून जातो किंवा त्याची उत्सुकता चाळवली जाऊन तो त्या गोष्टीची माहिती शोधतो. असाच एक भाऊ पर्वत सर करण्याचा प्रयत्न करत असताना त्याला चक्क भूत दिसले. 'डोंगर बल्लासनी वाट मा मना जीव भ्यायना' या अहिराणी गाण्याप्रमाणे तो चांगलाच घाबरला, मात्र त्याला जे दिसले ते भूत होते की दुसरे काय हे आता स्पष्ट झाले आहे.
इंग्लंडमधला थॉमस शॅलो नावाचा एक चाळीशीत असलेला गडी आपल्या मित्रांसोबत लेक डिस्ट्रिक्टमध्ये पर्वतसफरीवर निघाला होता. तिथे त्याला गोल इंद्रधनुष्य दिसलं आणि त्यातल्या गोल भागात माणसाची प्रतिकृती दिसली. काहीसा दृष्टीभ्रम किंवा ऑप्टिकल इल्युजन म्हणावा असा हा अनुभव होता. भाई हा प्रकार बघून चांगलाच घाबरला. काही काळ तर हा शॅलो चांगलाच वेडावला. काय चाललंय हेच त्याला कळत नव्हते. नंतर मात्र त्याला समजले की हा सर्व त्याच्या स्वतःच्या डोळ्यांचा खेळ सुरू आहे. तो स्वतःचीच प्रतिमा समोर बघत होता. ३० नोव्हेंबर रोजी घडलेली ही घटना आहे.
शॅलो आपल्या मित्रांसोबत लेक जिल्ह्यातील ग्रेट एन्डची सफर करत होता. तेव्हा त्याला ब्रोकन स्पेक्टर किंवा ब्रोकन बो म्हणून ओळखले जाणारे दुर्मिळ ऑप्टिकल इल्युजन दिसले. या दृष्टीभ्रमात बघणाऱ्या व्यक्तीची मोठी सावली ही ढगांवर पडते. म्हणजेच जसे आपण जसे कधीकाळी स्वतःची सावली जमिनीवर बघून घाबरलो होतो तसेच घडले, फक्त फरक हा होता की ती सावली त्याला जमिनीवर नाही, तर आकाशात दिसली होती. शॅलो हा हुशार निघाला, त्याने हा नजारा स्वतःच्या फोनवर कैद केला.
शॅलो म्हणतो की त्याला जे दिसले ते अतिशय सुंदर होते. आकाशात एखादा माणूस तरंगत आहे असे तिथे दिसत होते. विचित्र असला तरी हा अनुभव अतिशय भन्नाट होता.
हर्ज नावाच्या पर्वतावर द ब्रोकन नावाचे सर्वात मोठे शिखर आहे. हे नेहमी धुकं आणि ढगांनी आच्छादलेलं असतं. त्यावरून या इल्युजनचे नाव द ब्रोकन असे दिले गेले आहे. गेल्या वर्षी नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला असाच अनुभव ऱ्यास प्लेमिंग या व्यक्तीला आला होता. आपल्या मित्रांसोबत गेलेला असताना हा अनुभव त्याने घेतला होता.
उदय पाटील
