दख्खनची राणी - ८९ वर्षांची चपळ तरुणी !!

दख्खनची राणी - ८९ वर्षांची चपळ तरुणी !!

१९३० साली जन्मलेली दख्खनची राणी इतक्या वर्षानंतरदेखील आज त्याच चपळतेने धावत आहे. डेक्कन क्वीन किंवा दख्खनची राणी म्हणजे देशातील पहिली वहिली आरामदायी रेल्वे. मुंबई-पुणे या दोन्ही शहरांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणून दख्खनच्या राणीची ओळख आहे. १ जून १९३० साली ‘ब्रिटिश ग्रेट पेनिन्शुला’ने डेक्कन क्वीनची स्थापना केली. सुरुवातीला फक्त आठवड्याला एकदाच धावणारी डेक्कन क्वीन पुढे जाऊन रोज मुंबई-पुणे असा प्रवास करू लागली. इंद्रायणी, सिंहगड, प्रगती सारखी भावंडं येईपर्यंत डेक्कन क्वीन हीच सर्वात जास्त वेळ चालणारी रेल्वे होती. आयएसओ 9001-2000 प्रमाणपत्र मिळवणारी ही भारतातील केवळ दुसरी रेल्वे आहे.

स्रोत

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात डेक्कन क्वीन घर करून गेली ते तिच्या अतिशय काटेकोर वेळ आणि गतीसाठी. दरवर्षी प्रवासी डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करतात. सकाळी साडेसहाच्या सुमारास रेल्वे इंजिनची पूजा करण्यात येते तसेच गाडीला फुलांनी, पताकांनी सजवले जाते. पुणे स्टेशनवर आल्यानंतर प्रवाश्यांमध्ये एकच जल्लोष असतो. प्रवाशांच्या अत्यंत जवळची असणारी अशी डेक्कन क्वीन १ जून ला खरंच राणीचा वेश धारण करते. असे क्वचितच घडत असावे की प्रवाशांनी एका रेल्वेचा वाढदिवस साजरा करावा. पण दख्खनच्या राणीचा थाटच काही और आहे.

दख्खनच्या राणीवर एक सुंदर गाणंसुद्धा तयार करण्यात आलं होत. ऐकायला विसरू नका.