गरीब माणसांची श्रीमंत घरं - या घरांच्या प्रेमात पडाल राव !!

गरीब माणसांची श्रीमंत घरं - या घरांच्या प्रेमात पडाल राव !!

⁠⁠⁠⁠⁠बुर्किना फासो हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश. तसा गरिबीत जगणारा.  जगातला सर्वात गरीब देश म्हणा हवंतर.. चारी बाजूंनी इतर देशांनी वेढलेल्या या देशात एक गाव आहे मंडळी, ज्याने सर्वांच लक्ष आपल्याकडे आकर्षित केलंय. हे गाव घाना देशाच्या सीमेवर १.२ हेक्टर जागेत वसलंय. टिबेल (Tiébélé’ ) असं गावाचं नाव. गाव कसलं खेडंच म्हणा ना. या गावात राहणारे लोक हे १५ व्या शतकात बुर्किना फासोच्या प्रांतात स्थायिक झालेल्या सर्वात जुन्या प्रजातींपैकी एक आहेत. मंडळी या लोकांची खास ओळख म्हणजे यांची सजावट केलेली सुंदर घरे. पारंपारिक Gourounsi नावाच्या स्थापत्यकलेसाठी हे लोक ओळखले जातात.

tiebele-8

बुर्किना फासो देशातील लोक हे गरीब असले तरी त्यांच्या  संस्कृतीच्या बाबतीत ते श्रीमंत आहेत. वरील फोटोत दिसत असल्याप्रमाणे घराच्या भिंतीवर कलाकुसरीने सजावट करणे ही त्यांची पारंपारिक पद्धत आहे. त्यांची घर बांधण्याची देखील एक खास पद्धत आहे. पारंपारिक पद्धतीनुसार माती, लाकूड आणि पेंढा या तीन गोष्टींच्या आधारे गावातली घरे तयार केली जातात. माती आणि पेंढा एकत्र करून शेणाबरोबर त्याला एक जीव केले जाते. या तिन्ही गोष्टींमुळे एक लवचिक मिश्रण तयार होते आणि त्यामुळे घराच्या भिंती मजबूत तयार होतात. (याला पारंपारिक सिमेंट म्हणू शकतो.)

tiebele-0

सजावटीच्या कामात गावातील महिला सर्वात पुढे असतात. रंग मिश्रित मातीने आणि पांढऱ्या खडूने भिंतींवर चित्रं काढली जातात. ही चित्रे एक तर निसर्गाची असतात किंवा स्थानिक चालीरीतींना ध्यानात ठेवून काढलेली असतात. ही घरं पावसाळ्याआधी बांधली जातात.   वरून जरी ही सजावट वाटली तरी याचा मूळ उद्येश्य पावसापासून संरक्षणासाठी असतो. या प्रक्रियेत शेण, चिखल आणि त्यावर नेरे नावाच्या एका विशिष्ठ प्रकारच्या आफ्रिकन झाडांच्या उकळत्या बियांचा रस लावला जातो. या सर्वांमुळं भिंत वॉटर प्रुफ होते. पण रंग एकमेकांत मिक्स होऊ नये म्हणून प्रत्येक रंगासाठी नेरेची   प्रक्रिया वेगवेगळी केली जाते. त्यामुळं रंगांना छान तकाकीही येते.  या सर्व मिश्रणातून तयार होणाऱ्या भिंती पावसापासून उत्तम प्रकारे बचाव करतात. शेवटची प्रक्रिया म्हणजे त्यावर चित्र रेखाटने.

tiebele-6


असं म्हटलं जातं की ही पद्धती खूप पूर्वी म्हणजे 16 व्या शतकापासून चालत आली आहे.

काळ बदलून चिखल आणि शेणाची जागा रेडीमेड विटांनी आणि दगडांनी घेतली आहे. या गावातल्या घराची संपूर्ण बनवट ही हवामान किंवा बाहेरील जनावारापासून संरक्षणासाठी आहे त्यामुळे यात काळानुसार बदल होत गेले पण भिंतींना सजवण्याची पद्धत कालही होती आणि आजही आहे.

tiebele-5

tiebele-2

tiebele-7

(सर्व फोटो स्रोत)