मंडळी, १ जुलैपासून देशभरात GST लागू झालाय खरा. पण अद्यापही ग्राहकवर्गाला विविध वस्तूंचे कमी-जास्त झालेले दर समजून घेणं बरंच कठीण जातंय. कोणत्या वस्तू आणि सेवांवर किती टक्के टॅक्स लावला गेलाय? कोणती वस्तू महाग, आणि कोणती स्वस्त झालीय? त्या वस्तूवर लावला गेलेला दर योग्य आहे का? या सगळ्या प्रश्नांनी अजूनही आपण गोंधळात पडलोय.
अशात हॉटेलमधल्या जेवणावरही GST लावला गेलाय. सर्व्हिस टॅक्स, वॅट, हे सगळं जाऊन बिलावर आता GST चा आकडा दिसतोय. त्यामुळे हॉटेलात गेल्यावर तुमच्याकडून बिलाची भरमसाठ रक्कम तर उकळली जात नाहीये ना? आपल्यासोबत असं होऊ नये म्हणून आज आपण याबद्दल थोडी उपयुक्त माहिती घेणार आहोत...
पहिली गोष्ट म्हणजे देशातील सर्व हॉटेल्सचा समावेश हा १२% आणि १८% GST च्या गटामध्ये होतो. ज्या रेस्टॉरंट्सची वार्षिक उलाढाल ७५ लाखांपेक्षा कमी आहे तिथे फक्त ५% GST लावला जाईल. म्हणजेच सरसकट तुम्ही सगळ्या हॉटेलमध्ये १८% GST लावला जाऊ शकत नाही.

जर तुम्ही नॉन एसी हॉटेलमध्ये गेलात तर तिथे १२% GST लावला जाईल. पण ज्या नॉन एसी हॉटेल्समध्ये मद्य किंवा मादक पदार्थांची विक्री केली जाते, तिथे मात्र GST चा दर हा १८% असेल. सोबतच सर्व एसी हॉटेल्समधल्या जेवणावरही १८% GST द्यावा लागेल.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मद्य पदार्थांचा समावेश GST मध्ये केला गेला नसल्यामुळे GST हा फक्त तुमच्या जेवणावर लागू होईल. दारूचं बील वेगळं भागवावं लागेल! आणि जर जेवणाचं पार्सल घरी मागवलं तर त्यावरचा GST हा तुम्ही कोणत्या प्रकारच्या हॉटेलमधून जेवण मागवता यावर अवलंबून असेल. हॉटेलमध्ये मिळणाऱ्या हवाबंद स्नॅक्सवरसुध्दा १२% GST लावला गेलेला आहे.

आता केंद्र सरकारने आपल्या मदतीसाठी GST Rate Finder हे अॅपही उपलब्ध करून दिलंय. इथून तुम्ही कोणत्या वस्तू आणि सेवांवर किती GST लावला गेलाय हे तपासू शकता. तर मंडळी, इथून पुढे कोणत्याही हॉटेलमध्ये जेवताना बील बघून कन्फ्युज न होता ते योग्यरीतीने समजून घ्या म्हणजे झालं...
