प्रवास करायला कुणाला आवडत नाही? भरीस भर त्यात काही हटके, रोमांचक, थ्रिलिंग असेल तर मग विचारायलाच नको. आता हेच पाहा ना... परदेशात कुठेही जायचे म्हटले की विमानप्रवास ओघाने आलाच. पण इंग्लंडसारख्या दूरदेशी चक्क बसने जाण्याचा पर्याय कुणी समोर ठेवत असेल तर?? हो, हे आता नजिकच्या भविष्यकाळात घडू पाहात आहे. अशा प्रवासाची घोषणा झाली आहे आणि सध्या त्याचा मुहूर्त ठरलाय मे २०२१ मधला.
इतिहासाची पुनरावृत्ती अनेकदा होत असते. १९६० च्या दशकात कलकत्ता ते लंडन हा प्रवास बसने करण्याचा अभिनव प्रयोग करण्यात आला होता. त्या बसमध्ये फक्त २० प्रवासी होते. या बसचे एका वेळचे भाडे ८५ पौंड ते १४५ पौंड होते. याच धर्तीवर आता राजधानी दिल्ली ते लंडन असा बसप्रवास सुरू होत आहे. ‘बस टू लंडन’ हे त्या बसचे नाव. ही हटके सफर आयोजित केलीये दिल्लीच्या तुषार अग्रवाल आणि संजय मदान यांनी. लोकांना ही अनोखी सफर घडवणार्यासाठी त्यांनी स्वतः हा मार्ग २०१७-२०१९ ही तीन वर्षे कार प्रवास करत पालथा घातला आहे. योगायोगाची बाब म्हणजे त्यांनी ह्या सहलीसाठीही २० प्रवाशांचाच अंतर्भाव करण्याचे ठरवले आहे. या प्रवाशांबरोबर बसमध्ये असतील इतर चार लोक- गाईड, बस चालक, साहाय्यक चालक, आणि कंपनीचा एक प्रतिनिधी.
अॅडव्हेंचर ओव्हरलँड या कंपनीने यासंदर्भातली पोस्ट इन्स्टाग्रामवर जाहीर केली आणि तेव्हापासूनच लोकांमध्ये त्याबद्दल कमालीची उत्सुकता दिसून येतेय. पहिल्यांदा दिल्ली आणि लंडन दरम्यान चक्री बस सेवा सुरू होईल. या दौर्याचा एक भाग म्हणून लोक १८ देशांतून ७० दिवसांत २०,००० किमीचा प्रवास करतील. या संपूर्ण प्रवासाचा खर्च असेल १५ लाख रुपये. आयोजकांच्या धोरणानुसार, पूर्ण प्रवासासाठी पैसे देणार्या प्रवाशांना प्राधान्य दिले जाईल.
हा प्रवास भलताच रोचक असणार आहे. प्रवासादरम्यान प्रवासी म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेश्, थायलंड, लाओस, चीन, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, कझाकस्तान, रशिया, लात्विया, लिथुआनिया, पोलंड, झेक प्रजासत्ताक, जर्मनी, नेदरलँड्स, बेल्जियम आणि फ्रान्स या देशांना भेट देतील. यात जर कोणाला पूर्ण लंडनपर्यंत जायचे नसेल तर तशी कस्टमाईज्ड पॅकेजेस पण कंपनी उपलब्ध करून देणार आहे. 'बस टू लंडन' या बसमध्ये आरामदायी प्रवासासाठीच्या सर्व सुविधा आहेत. सगळ्या सीट्स बिझनेस क्लासच्या, मुक्कामाच्या ठिकाणी फोर स्टार, फाईव्ह स्टार हॉटेल्स अशी सगळी ऐष आहे. १८ देशांच्या या प्रवासात गाईड बदलले जातील. प्रत्येक प्रवाशाला या प्रवासासाठी १० देशांचा व्हिसा लागेल. पण त्याची काळजी कशाला? प्रवाशांच्या सोयीसाठी ही कंपनी व्हिसाची संपूर्ण सोयही करणार आहे.

