आज जगभर अजमल परफ्युम्सची ख्याती आहे. पण आज तुम्हाला माहीत असलेले आणि सगळीकडे गवगवा असलेले अजमल परफ्युम्स हे एका माणसाच्या मेहनतीचे फळ आहे. त्यांचीच गोष्ट आज आम्ही सांगणार आहोत.
हाजी अजमल अली असे या अवलियाचे नाव. त्यांच्या नावाआधी किंग लावले जाते. जगभर त्यांची ओळख परफ्युम किंग अशीच आहे. तर गोष्ट सुरू होते १९४० च्या दशकापासून. या सगळ्या उद्योगाची सुरुवात करणारे अजमल अली हे शेतकरी होते. ते मूळचे आसाममधल्या होजाई या गावचे. ते बरेचदा आपल्या गावाजवळच्या जंगलांमध्ये भटकत असत. या भटकंतीत अजमल अली दान अल औधच्या (अगरवूडच्या झाडापासून काढले जाणारे तेल) शोधासाठी फिरत असत. हळूहळू त्यांनी पुरेशी अगरवूडची झाडे शोधून काढली. पुढे जाऊन त्यापासून औध कसे काढायचे हे देखील ते शिकले.








