तुम्ही कधी केस कापायला सलूनमध्ये गेला आणि त्याने तुमच्या मनाप्रमाणे केस कापले नाहीत तर काय कराल? त्याला समजावाल, ओरडाल किंवा जास्तीत जास्त त्याला पैसे देणार नाही. पण चुकीचे केस कापण्यावर केस केलेली कधी ऐकलीय का? होय! एका महिलेने तिचे केस चुकीचे कापल्याबद्दल एका फाईव्ह स्टार सलॉनवर केस केली आहे आणि कोर्टाने त्या सलॉनला तब्बल २ कोटी रुपये भरपाई देण्यास सांगितले आहे. नक्की ही घटना कुठे घडली आहे हे आता सविस्तर बघूयात.
केस कापण्यात केलेल्या गलथानपणाची फाइव्ह स्टार हॉटेलला मिळतेय सजा ! ग्राहकाला द्यावी लागणार २ कोटींची नुकसानभरपाई!! पूर्ण गोष्ट वाचल्यावर ते योग्यच आहे असे वाटेल, वाचा !!


चेन्नईमध्ये आयटीसी मौर्या या पंचतारांकित हॉटेलच्या सलॉनमध्ये हेअर प्रोफेशनलच्या चुकीमुळे ४२ वर्षाच्या महिलेला खूप मनस्ताप भोगावा लागला आहे. ही महिला मॉडेलिंग व्यवसायात आहे. १८ एप्रिल २०१८ रोजी तिची महत्वाची मुलाखत असल्याने त्याआधी केस कापण्यासाठी ती या सलॉनमध्ये गेली होती. तिने तिथल्या हेअर प्रोफेशनला तिला नेमके कसे केस हवेत याच्या सूचना दिल्या. तिच्या पुढच्या बाजूला असलेल्या फ्लिक्ससाठी तिने फक्त ४-इंच ट्रिम करण्यास सांगितले होते. त्यानंतर तिने चष्मा काढून ठेवला आणि केस कापणे सुरू झाले. हेअर प्रोफेशनलने तिला आपले डोके खाली ठेवण्यास सांगितले होते. सगळं झाल्यावर जेव्हा तिने आरश्यात पाहिले तेव्हा तिला दिसले की तिचे लांब केस जास्तच कापले गेले आहेत. तिला अपेक्षित असलेली हेअर स्टाइल नसल्याने तिला धक्का बसला. निष्काळजीपणामुळे केस कापले गेल्यामुळे तिने तक्रार केली. सलॉनने याबाबत माफी मागितली, तिच्या सेवेसाठी शुल्क आकारले नाही. परंतु निष्काळजी केशभूषा करणाऱ्यावर कोणतीही कारवाई केली नाही. तिने याबाबत व्यवस्थापकाला कळवले. पण त्याने तिच्याशी गैरवर्तन केले. मग तिने आयटीसी हॉटेल्सचे तत्कालीन सीईओ दीपक हकसर यांना फोन केला आणि त्यांना या प्रकरणाबद्दल माहिती दिली. त्यानंतर आयटीसी मौर्याने तिला मोफत हेअर ट्रीटमेंट देण्याचे मान्य केले. पण परिस्थिती अजून बिघडली. केसांच्या उपचारादरम्यान तिचे केस आणि टाळू जास्त प्रमाणात वापरलेल्या अमोनियामुळे पूर्णपणे खराब झाले आणि टाळूमध्ये खूप जळजळ झाली. त्यामुळे तिला अजून मनस्ताप झाला.

त्या महिलेला तिच्या मॉडेलिंगच्या महत्वाच्या ऑफर सोडाव्या लागल्या. तिने पूर्वी VLCC आणि Pantene सारख्या मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग केले होते. परंतु तिचे लांब केस गमावल्यामुळे ती तिचे स्वप्न साकार करू शकली नाही. एवढेच नाही तर जिथे तिने वरिष्ठ व्यवस्थापन व्यावसायिक म्हणून काम केले होते ती नोकरीही गमावली. तिची जीवनशैली पूर्णपणे बदलली आणि तिचे टॉप मॉडेल बनण्याचे स्वप्न भंगले.

कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निकालात सांगितले की सलॉनच्या निष्काळजीपणामुळे तिला गंभीर मानसिक आघात सहन करावा लागला आणि तिला आर्थिक नुकसानही भोगावे लागले. त्यामुळे तिचा मानसिक आघात आणि नुकसान लक्षात घेता, न्यायालयाने आयटीसी मौर्याला संबंधित महिलेला २ कोटी रुपये भरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायालयाने पुढे सांगितले “स्त्रियांसाठी केस हा भावनिक विषय आहे. केस चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी त्या भरपूर रक्कम खर्च करतात. तिच्या सूचनांविरूद्ध केस कापण्यामुळे तिने तिची अपेक्षित असाइनमेंट गमावली आणि तिला मोठे नुकसान सोसावे लागले."
व्यवसायात निष्काळजी केल्याने चूक केली तर किती महाग पडू शकते याची कल्पना या प्रकरणामुळे आली. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (एनसीडीआरसी) हा निकाल दिला. या प्रकरणाची सगळीकडे चर्चा होतेय.
शीतल दरंदळे