देवास, मध्यप्रदेशमधल्या नोटांच्या छापखान्यातील डेप्युटी कंट्रोल अधिकाऱ्याने तब्बल ९० लाख रुपये चोरी केल्याची केस नुकतीच उघडकीस आली आहे. हा ठग चक्क आपल्या बुटांमध्ये नोटा लपवून न्यायचा. सहसा बँकेत किंवा घरावर दरोडा पडतो, पण हा मनुष्य प्राणी तर घरचा भेदी निघाला ना राव.
मनोहर वर्मा असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. तो नोटा व्हेरिफिकेशन विभागाचा प्रमुख होता. गेल्या ३ महिन्यांपासून तो छापखान्यातून नोटा लंपास करण्याचं काम करत होता. छापखान्यात ज्या नोटा काही कारणांनी रिजेक्ट केल्या जातात, त्या तो आपल्या बुटांमध्ये लपवायचा. या थोडा डिफेक्ट असलेल्या नोटा बाद म्हणून ओळखणं अवघड असतं. याचाच फायदा हा मनुष्य घेत होता. त्याचे पाय ८ नंबरच्या बुटांमध्ये फिट बसत असले तरी नोटा चोरण्यासाठी त्याने १० नंबरचे बूट वापरण्यास सुरुवात केली होती. नियमानुसार तपासणीच्या वेळी कोणत्याही अधिकाऱ्याचे कपडे आणि बूट तपासले जात नाहीत. याच गोष्टीचा फायदा मनोहर वर्माला झाला. कायद्यातील पळवाटा नेहमी चोर मंडळींच्या पथ्यावर पडतात त्याचच हे उदाहरण.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांना ‘सीसीटीव्ही’ फुटेजमध्ये मनोहर जोशीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तो रिजेक्ट झालेल्या नोटा ज्या बॉक्स मध्ये ठेवल्या जायच्या त्या ठिकाणी फिरकून आपल्या बुटांमध्ये काही तरी लपवत असल्याचं साफ दिसत होतं. सुरक्षा दलाच्या जवानांनी आपल्या अधिकाऱ्यांना ही माहिती कळवली. त्यानंतर त्याच्यावर छुपा पहारा देण्यात आला आणि दुसऱ्याच दिवशी त्याला रंगेहाथ् पकडण्यात आलं.
यावेळी त्याच्या लॉकरमधून तब्बल २६.९ लाख एवढी रोकड जप्त करण्यात आली. त्याच बरोबर त्याच्या बुटांमध्ये २०० च्या नोटांची बंडलही सापडली. आणखी तपासात त्याच्या घरी ६४ लाख लपवलेले आढळले. एकूण त्याने ९० लाख रुपये चोरले होते.
शेवटी एक प्रश्न पडतोच : हा माणूस ३ महिने चोरी करत राहिला, तरी कोणाला त्याची खबर कशी लागली नाही ?
