झाडं, ढग, पाऊस, नद्या, समुद्र, सूर्य हे सगळे निसर्गाचे घटक. आपल्या संस्कृतीने निसर्गाला देवत्व बहाल केलेलं आहे. निसर्गाने देऊ केलेल्या विविध गोष्टींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचीही आपली परंपरा आहे. पण म्हणून निसर्गाच्या विविध रूपांमध्ये आपण मानवी अंश बघत नाही. किंबहुना अग्नि रागावतो, ढग हसतो, किंवा समुद्र लबाड आहे अशा प्रकारच्या कल्पना आपण फक्त बालवाङ्मयातच वाचतो किंवा ऐकतो. मात्र शतकभरापूर्वी रशियामध्ये एक मनुष्य होऊन गेला. त्याने निसर्गाच्या प्रत्येक घटकाला माणूस मानलं होतं आणि तो त्याचा उल्लेखही तसाच करायचा. हरीण असो वा रानडुक्कर, ढग असो अथवा सूर्य, झाड असो किंवा जमीन; या सगळ्यांसाठी तो 'माणूस' हा एकच शब्द वापरायचा. उदाहरणार्थ, समुद्र खवळलेला असेल तर 'हा माणूस आज का चिडला आहे?' किंवा अवेळी ढग आले तर 'लबाड माणूस, नेहमी असाच फसवतो!' असं तो बोलत असे. त्यामुळे त्याचं बोलणं काहीसं विचित्र, चमत्कारिक वाटलं तरी त्यावरून तो निसर्गाशी किती एकरूप झाला होता हे लक्षात येतं. शहरी संस्कृतीचा जरासाही स्पर्श न झालेल्या या भटक्या माणसाचं आयुष्यविषयक तत्त्वज्ञान इतकं सहजसोपं आणि सुंदर होतं, की शहरी माणसालाही एकवार इतकं निरागस असावं असा मोह होईल. निसर्गाला जमेल तितकं ओरबाडणाऱ्या आपल्यासारख्यांना मनोमन लाज वाटेल असं त्याचं वर्तन होतं. पशुपक्षी, झाड, मनुष्य ही सगळी जंगलाची लेकरं. त्यामुळे प्रत्येकासाठी या अफाट जंगलात जागा आहे, असायला हवी, असं म्हणणारा हा मनुष्य शहरी माणसाच्या 'अजून हवं' या हव्यासावर नेमकं बोट ठेवतो. त्याचं नाव होतं देरसू उझाला.
रशियात पूर्वभागात व्लाडिओस्टॉक हे शहर आहे. व्लाडिओस्टॉक म्हणजे पूर्वदिशेचा सरदार! त्याच्या जवळून रशिया आणि चीनच्या सीमेलगत उसुरी नावाची नदी वाहते. या नदीच्या बाजूला असलेल्या उसुरिया नावाच्या दुर्गम प्रदेशाचे नकाशे तयार करण्याचं काम रशियन सैन्यातील व्लादिमिर अर्सेनिव्ह नावाचा सर्व्हेअर करत होता. ही गोष्ट आहे १९०२ सालातली. या काळात तंत्रज्ञान आजच्यासारखं विकसित नव्हतं. त्यामुळे अवघड दुर्गम प्रदेशातील जीवसृष्टी, डोंगरदऱ्यांसारखी भूरूपं, लोकजीवन यांचा अभ्यास करण्यासाठी तो प्रदेश एक्सप्लोअर करावा लागे. त्या प्रदेशाचे हाताने नकाशे तयार करावे लागत. त्यासाठीच्या मोहिमा अनेक दिवस चालत. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि लष्करीदृष्ट्या या मोहिमांना महत्त्व असे. या मोहिमेदरम्यान व्लादिमिरला नदीखोऱ्यातील पाणलोट क्षेत्रांचा प्राथमिक अभ्यास, जवळ असलेल्या सिहोते ऍलिन पर्वतरांगांचा अभ्यास आणि वन्यप्राणी, वनस्पती व स्थानिक मानवसमूहांचा अभ्यास करायची जबाबदारी दिलेली होती. त्यासाठी त्याच्या दिमतीला सैबेरियन रायफल्सची एक तुकडी देण्यात आली होती.


