'कर लो दुनिया मुठ्ठी में' म्हणत आज आपण बसल्याजागी जगातल्या कुठल्याही गोष्टीची माहिती मिळवू शकतो, सातासमुद्रापार असणाऱ्या आपल्या जिवलगाशी संपर्क साधू शकतो, नवनवीन गोष्टी शिकू शकतो, खरेदी करू शकतो, आणखी बरंच काही करू शकतो. ही सगळी कॉम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी यांची देणगी आहे. पण आज कॉम्प्युटरचं हे रूप उत्क्रांत झालंय ते अनेकांच्या संशोधनातून. ग्रेस मेरी हॉपर ही यापैकीच एक. ९ डिसेंबर १९०६ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्म झालेल्या ग्रेसला कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या विकासाची प्रणेती मानलं जातं. तिने युनिव्हॅक १ या पहिल्या व्यवसायिक इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटरच्या निर्मितीतही मदत केली होती. तिने कोबोल या भाषेच्या निर्मितीसाठीही योगदान दिलं. पण तिने दिलेली सगळ्यात मोठी भेट म्हणजे कम्पायलरची निर्मिती. कम्पायलर हा दुभाषाप्रमाणे काम करतो. हे सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग लँग्वेजचं कॉम्प्युटरला समजेल अशा भाषेत (० आणि १ ची भाषा) रूपांतर करतो. कंपायलर नसेल तर जगातला कुठलाही प्रोग्रॅम चालणार नाही. मग कुठलं आलंय फेसबुक-इन्स्टा, गूगल आणि ॲप्स!! कंपायलर आहे तर सगळं जग आहे राव!!
ग्रेस हॉपरने गणित व भौतिकशास्त्र या विषयांमधून बी. ए. डिग्री मिळवल्यावर पुढील शिक्षणासाठी येल युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळवला. त्यानंतर ज्या कॉलेजमध्ये तिने बी. ए.ची डिग्री प्राप्त केली, तिथेच ती गणित शिकवू लागली. अमेरिकन नौसेनेत नेमणूक होण्याआधी ती या कॉलेजमध्ये गणित शिकवत होती. हे साल होतं १९४३. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ती अमेरिकन नौदलामध्ये रुजू झाली. १९४४ मध्ये ती लेफ्टनंट झाली.
त्याचवेळी हार्वर्ड युनिव्हर्सिटीत ब्युरो ऑफ ऑर्डिनन्स कॉम्प्युटेशन प्रोजेक्टवर तिची नेमणूक झाली. या ठिकाणीच ती मार्क-१ या कॉम्प्युटरवर काम करत होती. हा पहिलावहिला स्वयंचलित कॅल्क्युलेटर होता. इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटरची ही पूर्वावस्था. यासाठी तिने एक मॅन्यूअलही लिहिलं. यात तिने मार्क-१ कसा वापरायचा आणि कॉम्प्युटरचं पहिलं प्रोग्रामिंग करताना काय करायचं याची माहिती दिली. एकीकडे नौदलातली कारकीर्द आणि दुसरीकडे हार्वर्डमधलं संशोधन अशा दोन्ही डगरींवर पाय देऊन ती भक्कम उभी राहिली.

