शेख मोहम्मद आणि ५,००० करोडचा घटस्फोट!! जिथे घेतला जातोय, नवरा-बायको दोघेही त्या देशाचे रहिवासी नाहीत!!

शेख मोहम्मद आणि ५,००० करोडचा घटस्फोट!! जिथे घेतला जातोय, नवरा-बायको दोघेही त्या देशाचे रहिवासी नाहीत!!

शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतुम हे नाव जितके मोठे आहे, तितकाच या माणसाचा पसारा मोठा आहे. हे दुबईचा शासक असलेल्या माणसाचे नाव आहे. इतकेच नाही तर यूएईचे ते पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती आहेत. आता यांचा श्रीमतीचा पसारा सांगण्याची गरज नाही. पैसा अफाट असेल हे तर तुमच्या लक्षात आले असेलच.

शेख मोहम्मद आलिशान आयुष्य जगतात. त्यांना एकूण ६ बायका आहेत. ६ बायकांपासून त्यांना अनेक मुले झाले असतील हे ही वेगळे सांगण्याची गरज नाही. पैसा खूप असला तरी त्यांच्या आयुष्यातील स्त्रियांना स्वातंत्र्य मात्र नाही.

२००४ साली शेखचे ६ वे लग्न झाले, जॉर्डनचे राजे अब्दुल्लाची सावत्र बहीण हया हिच्यासोबत. या दोघांमध्ये तब्बल २५ वर्षांचे अंतर असूनही दोघांचं ट्युनिंग चांगलंच जुळलं होतं. जिथे तिथे हे जोडपे सोबत दिसत होते. एकमेकांची स्तुती करताना ते थकत नसत.

सर्व काही सुरळीत सुरू असताना २०१९ साल उजाडले. तुम्हाला आठवत असेल तर दुबईच्या राणीचे बॉडीगार्डसोबत अफेयर अशा बातम्या तुम्ही वाचल्या असतील. तर ती राणी हयाच होती. हया आणि बॉडीगार्डचे अफेयर आहे अशी शंका शेख घेऊ लागले. शेख इतका पोहोचलेला निघाला की आपल्या बायकोमागे थेट पेगासस लावून हेरगिरी करत असे.

आता हळूहळू या हयाच्या अफेयर्सच्या अधिक विस्तृत बातम्या समोर येत आहेत. हयाचे एका बॉडीगार्डसोबत अफेयर होते, तर या गोष्टीची माहिती असलेल्या इतर बॉडीगार्डना आपले तोंड बंद ठेवण्यासाठी तुफान पैसा ती खर्च करत होती. आपल्या १० वर्षीय मुलीच्या खात्यातून तिने ७.५ मिलियन डॉलर काढून ते बॉडीगार्डना दिले होते.

हयाचे वय ४७ वर्ष आहे, तर रिपोर्ट्स ज्या बॉडीगार्डसोबत तिचे अफेयर असल्याचे येत आहेत त्या ब्रिटिश नागरिक रसेल फ्लॉवरचं वय आहे ३७ वर्ष. प्रेमात वय आणि परिस्थिती बघितली जात नाही याचे कदाचित उदाहरण म्हणून ही लव्हस्टोरी सांगितले जाईल की काय माहीत नाही. २०१६ साली त्यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. शेवटी ७२ वर्षीय शेखही काय कमी नाही.

हयाने लाख प्रयत्न करूनही शेखला या गोष्टीची माहिती लागली. हया गुपचूप आपली दोन्ही मुले घेऊन ब्रिटनला निघून गेली. तिथे मग घटस्फोटासाठी खटला उभा राहिला. २ वर्ष चाललेला हा खटला आता अंतिम टप्प्यात आला आहे. दोन्ही मुलांची जबाबदारी हयालाच देण्यात यावी असे न्यायालयाने म्हटले आहे. आता यानुसार जी तडजोड झाली आहे त्यात शेख मोहम्मद हयाला तब्बल पाच हजार कोटी रुपये देणार आहे.

ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात महाग घटस्फोट म्हणून विषयाची चर्चा आहे. विशेष म्हणजे या दोघांपैकी कुणीच मूळ ब्रिटिश नाही. शेख मोहम्मद कडून मिळणार असणारा पैसा हयाच्या मुलांच्या सुरक्षा आणि शिक्षणाच्या खर्चासाठी तसेच इतर अनेक गोष्टींवर खर्च केला जाणार आहे.

उदय पाटील