वर्कशॉपमध्ये बनवलेल्या किक स्टार्ट जीपच्या आनंद महिंद्रा थेट बोलेरो ऑफर केली, पण ही ऑफर चक्क नाकारली गेली!!

लिस्टिकल
वर्कशॉपमध्ये बनवलेल्या किक स्टार्ट जीपच्या आनंद महिंद्रा थेट बोलेरो ऑफर केली, पण ही ऑफर चक्क नाकारली गेली!!

आपल्याकडे जुगाड करून जुन्यातून नवी वस्तू बनवणे काही नवे नाही. ते जरी गरजेपोटी किंवा पैसे वाचवण्यासाठी बनवले जात असेल तरी त्यातल्या काही कल्पना खरंच भन्नाट असतात. अशीच भारी आयडिया लढवून सांगली जिल्ह्यातल्या देवराष्ट्रे नावाच्या गावात एकाने जीप बनवली आणि तीही किक स्टार्ट मारून सुरू होणारी! त्याचा व्हिडिओ इतका चर्चेत आला की तो आनंद महिंद्रा यांनी पाहिला आणि त्याला त्या जीपच्या बदल्यात चक्क बोलेरो ऑफर केली आहे. पण प्रकरणाने नंतर अनपेक्षित वळण घेतलं. बघूया नक्की घडलंय काय?

देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांनी एक मिनी जीप बनवली आणि त्याचा व्हिडिओ कोणीतरी सोशल मीडियावर शेअर केला. त्याचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की त्यांचे कौतुक सगळीकडे होऊ लागले. त्यांनी जीप बनवली आणि तीही फक्त ६० हजारांत! त्यासाठी दुचाकीचे इंजिन, चारचाकी गाडीचं बॉनेट आणि रिक्षाच्या चाकांचा वापर केला. ही भन्नाट जीप किक स्टार्ट आहे. लोहार यांचं स्वत:चं फॅब्रिकेशनचं वर्कशॉप आहे. ही जीप ४० ते ४५ किलोमीटर प्रवास एक लिटर पेट्रोलमध्ये करते. त्यांची ही जीप पाहून अनेकांनी अशाप्रकारची जीप बनवून देण्याची ऑर्डरही दिली आहे.

आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ पाहिला आणि रिट्विट करत त्याचे कौतुक केले. त्यांनी सांगितले ही जीप कारनिर्मिती नियमांनुसार नक्कीच बनवली नाही. पण कमीतकमी खर्चात अशी गाडी बनवणे खरंच कौतुकास्पद आहे'. ही जीप आणि हा प्रयोग आनंद महिंद्रांना एवढा आवडला की त्यांनी ही जीपच या व्यक्तीकडून मागताना एक खास ऑफर दिली. त्यांनी जीपच्या बदल्यात लोहार यांना बोलेरो गाडी देण्याची आणि ती जीप एक कल्पकतेचे प्रतीक म्हणून महिंद्रा संशोधन व्हॅलीमध्ये ठेवायची इच्छा असल्याचे जाहिर केले.

 

दत्तात्रय लोहार त्यांची ऑफर स्वीकारतात की नाही याबद्दल उत्सुकता होती. पण दत्तात्रय यांनी आनंद महिंद्रा यांची ऑफर नाकारली आहे. ते म्हणतात,"त्यांना माझी गाडी आवडली याचा मला आनंद आहे. पण त्या बदल्यात मिळणारी नवी गाडी वापरण्याची माझी परिस्थिती नाही. त्यासाठीचा कर, इंधन भरण्याची माझी ऐपत नाहीये." तसेच दत्तात्रय यांच्या पत्नी राणी यांचाही त्यांच्या किकस्टार्ट गाडीवर खूप जीव आहे. त्यांनी तर स्पष्टच म्हटलं की, "ही आमच्या घरातली पहिली लक्ष्मी असल्याने ती द्यावीशी वाटत नाही. ती आल्यापासून आमचं आयुष्य नीट सुरू आहे. हवंतर त्यांच्यासाठी आम्ही दुसरी बनवून देऊ. तरीही त्यांनी नवी गाडी खुशीने दिली तर देऊ. पण या गाडीच्या बदल्यात नाही."

दत्तात्रय लोहार यांचा नकारही खूप चर्चेत आहे. काहीजणांना त्यांनी ती ऑफर स्वीकारावी असे म्हटले आहे, तर काहींना लोहार यांचे कौतुक वाटते. आता पुढे काय होणार हे पाहणे रंजक ठरेल.

शीतल दरंदळे