कापसांच्या वस्त्राशिवाय श्रावणातलीच काय, कोणतीही पूजा अपूर्ण आहे. या श्रावणात आपल्या नेहमीच्या वस्त्रांसोबत ही अनोखी वस्त्रे घरच्या घरी तयार करा आणि लोकांची वाहवा मिळवा. चित्रं पाहून वाटतं तितकी ही कला अवघड मुळीच नाही. यासाठी तुमच्याकडे हवा लांबलचक वाती वळण्यासाठी कापूस, थोडी विभूती पावडर, कलाबूत- म्हणजेच चकचकीत बेगडी कागद आणि चिकटवण्यासाठी फेविकॉल किंवा चांगल्या प्रतीचा गोंद.
ही वस्त्रं बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक लांबच लांब वात तयार हवी. इथं थोडा सराव करून एकसारख्या जाडीची आणि थोडी घट्ट्सर लांबलचक वात तयार करून घ्या. वात वळताना हाताला थोडी विभूती लावली तर हे काम सुबक आणि पटकन होतं. हवंतर विकतच्याच वातीला थोडं विभूतीच्या हाताने पुन्हा वळलं, तरीही छानशी हवीतशी वात तयार होईल. आता या वातीची फुलं तयार करायची...






