भटकी कुत्री घराजवळ येताच त्यांना दगड मारणारे महाभाग काही कमी नसतात. अनेकांना प्राण्यांचे वावडे असते, पण कदाचित त्यांना हे माहिती नसावे की माणसापेक्षा हे प्राणीच आपल्यासाठी कितीतरी जास्त उपकारक ठरू शकतात. घरात पाळलेले हे प्राणी प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून आपल्या मालकाचे आणि त्याच्या कुटुंबाचे रक्षण करतात. अगदी छोटेसे मांजराचे पिल्लूदेखील घरात घुसू पाहणाऱ्या एखाद्या सापाला अडवून धरते. अशीच ही गोष्ट आहे, ब्रिटनमधील एका धाडसी कुत्रीची. या कुत्रीने आपल्या मालकाचा आणि परिसरातील शेजाऱ्यापाजाऱ्यांचाही जीव वाचवला. तेही एकदा नाही, तर दोनदा. दोन्हीवेळी तिने केलेल्या या कामगिरीसाठी तिला सन्माननीय ब्लू क्रॉस मेडलने गौरवण्यात आले होते.
कोण होती ही कुत्री आणि तिने नेमकी काय कर्तबगारी गाजवली होती जाणून घेऊया या लेखातून.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीने ‘द ब्लीझ’ नावाचा एक प्रोग्राम आखला होता. या प्रोग्रामनुसार जर्मन सैनिक ब्रिटनमध्ये कुठेही बॉम्ब वर्षाव करत. असाच एक बॉम्ब ज्युलियानाने आपल्या मालकाच्या घराच्या छतावरून खाली घरंगळत येताना पहिला. त्या बॉम्बची वात जळत होती. तेवढ्यात ज्युलीयाना त्या बॉम्बवर जाऊन उभी राहिली आणि त्यावर तिने 'शू' केली. ज्यामुळे तो बॉम्ब विझला आणि मोठी जीवित हानी टाळली. ही ज्युलियाना ग्रेट डेन जातीची एक कुत्री होती. तिच्या या पराक्रमाची दखल घेऊन १९४१ साली तिला ब्लू क्रॉस मेडल देण्यात आले.
त्यानंतर १९४४ साली तिने दुसऱ्यांदा हे मेडल मिळवले. यावेळी तिच्या मालकाच्या दुकानात एके ठिकाणी आग लागली होती आणि मालकाचे त्याकडे लक्षच नव्हते. जोपर्यंत मालक आपल्याकडे लक्ष देत नाही आणि आपल्या मागून येत नाही तोपर्यंत ती त्याच्या शेजारी उभी राहून भुंकत राहिली. शेवटी तिचा मालक तिच्या मागोमाग गेला आणि तेव्हा त्याच्या लक्षात आले की किती मोठा अनर्थ घडला आहे. तिच्या सतर्कतेमुळे दुसऱ्यांदा एक मोठी जीवित हानी टळली होती.

