चकडा एक्सप्रेसचा टीझर आताच प्रदर्शित झाला. अनुष्का शर्मा यामध्ये झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे अशी चर्चा आहे. भारतात क्रिकेटची अक्षरश: पूजा होते, पण महिला क्रिकेट संघाची ओळख फारशी कोणाला नाही.
झुलन गोस्वामीने भारतीय क्रिकेट संघाचा चेहरामोहरा बदलून टाकला. एक वेगवान गोलंदाज आणि भारतीय महिला संघाची माजी कर्णधार म्हणून झुलन गोस्वामी हे नाव क्रिकेटप्रेमींना परिचित असेल. पण त्याशिवाय अनेक विक्रमही तिच्या नावावर आहेत . आज आपण या दमदार खेळाडूची ओळख करून घेऊयात.
झुलन गोस्वामी मूळची पश्चिम बंगालची आहे. झुलन गोस्वामीचा जन्म २५ नोव्हेंबर १९८२ रोजी येथील नादिया जिल्ह्यात झाला. झुलनच्या आईचे नाव झरना आणि वडिलांचे नाव निशित गोस्वामी आहे. झुलनचे वडील इंडियन एअरलाइन्समध्ये काम करतात. झुलनचे सुरुवातीचे शिक्षण जिल्ह्यातील चकडा शहरात झाले. तिला लहानपणापासूनच खेळाची आवड होती, पण तिच्या आईला झुलनचे मुलांसोबत क्रिकेट खेळणे आवडत नव्हते. त्या काळात झुलन टेनिस बॉलने गोलंदाजी करत असे. मुलं तिच्या गोलंदाजीवर चौकार-षटकार मारायचे आणि झुलनच्या संथ गोलंदाजीची खिल्ली उडवायचे. तिथेच झूलनने ठरवले की ती एक वेगवान गोलंदाज होणार.






