'दृश्यम' सिनेमा आठवतोय? या सिनेमात त्या कुटुंबाने गुन्हा केला आणि खोटी गोष्ट खरीच आहे हे पुन्हा पुन्हा सांगून पोलिसांना पटवून दिलं. हा सिनेमा खूप गाजला. लोक नेहमीच नव्या गोष्टीपासून प्रेरित होतात. चित्रपटातून प्रेरणा घेणारेही अनेकजण असतात.पण चुकीच्या गोष्टी शिकून त्या करण्याचा प्रयत्न केला तर चूक अंगाशी ही येते. अशाच एका कुटुंबाची कहाणी पाहूयात ज्यांनी दृश्यम सिनेमा पाहून त्यातून प्रेरणा घेतली आणि त्यानंतर ते चांगलेच अडचणीत आले.
बेंगळुरूमधील एका कुटुंबातील ५ जणांनी चोरीचा कट रचला. ५५ वर्षांच्या रविप्रकाश यांनी या कटाचे नेतृत्व केले. त्यांचा ३० वर्षांचा मुलगा मिथुनकुमार, सून संगीता, मुलगी आशा आणि जावई नल्लू चरण यांनी रविप्रकाश यांना साथ दिली. तसेच मिथुनकुमारचा ड्रायव्हर दीपक आणि मित्र अस्मा हेही त्यांच्यासोबत होते. बेंगळुरूमधील आणेकल येथे ही घटना घडली. विशेष म्हणजे हे त्यांनी दुसऱ्यांदा केले. पहिल्या प्रयत्नात ते सुटले होते.
काही महिन्यांपूर्वी यांनी घरातील सर्व सोने यशवंतपूर येथील एका दलालाकडे गहाण ठेवले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांत सोने लुटल्याची फिर्याद दिली. पोलिसांना साहजिकच ते खरे वाटले म्हणून त्यांनी सर्वत्र शोध घेऊन या प्रकरणाचा छडा लावला. तो दलाल यामध्ये पकडला गेला आणि त्याच्याकडचे गहाण ठेवलेले सोने आणि पैसे त्या कुटुंबाला परत मिळाले. त्यांनी पोलिसांसमोर बनाव केलेला पकडला गेला नाही. त्यामुळे साहजिकच त्यांना आनंद झाला आणि त्यांनी दुसऱ्यांदा वेगळीच योजना आखली. पण दुसऱ्यांदा नशीब त्यांच्या सोबत नव्हते आणि ते पकडले गेले.
दुसऱ्या वेळी कुटुंबातील आशा यांनी चोरी झाल्याचा बनाव केला. १९ सप्टेंबर २१ रोजी सर्जापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की ती कपडे खरेदी करण्यासाठी दुकानात गेली असता तिची बॅग चोरीला गेली. बॅगेत ३० हजार रुपये रोख, मोबाईल फोन आणि १२५० ग्रॅम सोने होते. त्याने सांगितले की एक माणूस कपड्याच्या दुकानात घुसली आणि बॅग घेऊन पळून गेला. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा इतर कुटुंबीयांनीही अशीच माहिती दिली. आशा यांनी जे सांगितले त्या अनुषंगाने त्यांनी पुढची घटना सांगितली. पोलिसांनी कसून तपास सुरू केला आणि सुमारे ५०० ग्रॅम सोने शोधण्यात त्यांना यश आले. मात्र या वेळी पोलिसांना दीपकवर संशय आला. पोलिसांनी दागिने मिळवल्यावर कुटुंबाने ते दागिने स्वतःचे असल्याचे सांगितले. पण दागिन्यांची रचना मुस्लिम माहिला घालतात अशी होती. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. पुढे पोलिसांनी पूर्ण कुटुंबाची कडक चौकशी केली आणि तपासात त्यांची गुप्त योजना उघडकीस आली. पोलिसांनी सर्व कुटुंबाला अटक केली.
शेवटी, कथानक कितीही चांगले वाटली तरी, चित्रपटात दाखवल्याप्रमाणे खऱ्या आयुष्यात घडत नाही. हेच या घटनेतून शिकायला मिळते
शीतल दरंदळे
