जाणून घ्या ११ वेळा राष्ट्रपती शौर्यपदक मिळवणाऱ्या डीसीपी संजीव कुमार यादव यांच्याबद्दल!! यांच्यावरच 'बाटला हाऊस' सिनेमा बेतला होता.

लिस्टिकल
जाणून घ्या ११ वेळा राष्ट्रपती शौर्यपदक मिळवणाऱ्या डीसीपी संजीव कुमार यादव यांच्याबद्दल!! यांच्यावरच 'बाटला हाऊस' सिनेमा बेतला होता.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ज्याप्रमाणे विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या लोकांना पद्म पुरस्कार घोषित केले जातात. त्याचप्रमाणे पोलीस दलातील असामान्य कर्तृत्व दाखवणाऱ्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक घोषित केले जाते. यात काही पदके ही शौर्यपदक म्हणून दिली जातात. पद्म पुरस्कारांप्रमाणे हे पुरस्कार एका व्यक्तीला आयुष्यात फक्त एकदा दिली जात नाहीत. एकापेक्षा जास्त वेळ कर्तृत्व दाखवले तर एकापेक्षा जास्त वेळ राष्ट्रपती पदक मिळू शकते.

यावर्षी देशभरात ९३९ पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके घोषित केली गेली आहेत. यातली १८९ पदके हे शौर्यपदक म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

या नावांमध्ये एक नाव मात्र विशेष आहे. कारण त्यांना एक दोन नव्हे, तर तब्बल ११ व्यांदा घोषित झाले आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेलचे डीसीपी संजीव कुमार यादव यांना राष्ट्रपतींचे पोलीस मेडल फॉर गॅलंट्री घोषित झाले आहे.

संजीव कुमार हे अधिकारी प्रचंड कर्तृत्ववान असतील हे एव्हाना तुम्हाला कळून चुकले असेल. १५ गंभीर खटले, ४४ दहशतवादांशी निगडित खटले तसेच १०० दहशतवाद्यांना अटक करणे असा दांडगा त्यांच्या कामगीरीचा आलेख आहे. ज्या दहशतवादी संघटनांचे नावे ऐकून धस्स होते अशा लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, इंडियन मुजाहिदीन, हिजबुल मुजाहिदीन, बब्बर खालसा इंटरनॅशनल, सिमी आणि नक्षल अशा विविध देशाला घातक ठरू शकणाऱ्या संघटनांतील दहशतवादी त्यानी पकडून आणले आहेत.

संजीव कुमार यादव २००४ पासून दिल्ली पोलिसांच्या दहशतवाद विरोधी स्पेशल सेलचे नेतृत्व करत आहेत. २००५ साली यादवांनी दिल्ली येथील सिरीयल ब्लास्ट केस सोडवून दाखवले होते. या हल्ल्याचा म्होरक्या लष्कर ए तोयबाचा दहशतवादी अबू हुझेफा कश्मीरमध्ये एका चकमकीत मारला गेला होता. त्यांच्याच नेतृत्वाखालील टीमने देशभरातील ५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना अटक करत इंडियन मुजाहिद्दीन संघटना मुळापासून संपवली होती.

२००१ ते २०१० या काळात भारतात झालेले प्रमुख दहशतवादी हल्ले कुठले असे विचारले तरी सर्र्रकन जर्मन बेकरी स्फोट, जामा मस्जिद स्फोट, दिल्ली, जयपूर, सुरत, अहमदाबाद सिरीयल ब्लास्ट, यूपी कोर्ट स्फोट, मुंबई ब्लास्ट असे बॉम्बस्फोट समोर येतात. या सर्व केसेसमध्ये संजीव यादव हे प्रमुख अधिकारी म्हणून काम बघत होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली २६/११ हल्ल्यातील आरोपी अबू जिंदाल याला अटक करण्यात आली होती.

त्यांच्या कारकिर्दीतील प्रमुख घटना म्हणजे २००८ साली झालेली प्रसिद्ध बाटला हाऊस एन्काऊंटर केस. या एन्काऊंटरचे नेतृत्व यादव यांनी केले होते. यात छोटा साजिद आणि अतिफ अमीन हे इंडियन मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी ठार झाले होते. याच घटनेवर आधारीत बाटला हाऊस नावाचा सिनेमा येऊन गेला आहे. यात जॉन अब्राहम याने संजीव कुमार यादव यांची भूमिका साकारली आहे.

संजीव कुमार यादव गेली २० वर्ष दहशतवादी कारवायांचे षड्यंत्र मोठ्या शौर्याने उखडून फेकण्याचे काम करत आहेत. याच कारणाने तब्बल ११ वेळा त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले आहे.

उदय पाटील