कांचन चौधरी भट्टाचार्य हे असे नाव आहे ज्यांनी पोलीस खात्यात काम करून खात्याला एक नवी ओळख मिळवून दिली. या भारतातील दुसऱ्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी केवळ गुन्हेगारांच्या मनात केवळ भीती निर्माण केली नाही, तर पोलिस सेवेत असताना त्यांनी अनेक स्तुत्य कामे केली. उत्तर प्रदेशातील त्या पहिल्या महिला IPS, पहिल्या महिला DIG आणि पहिल्या महिला IG आहेत. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी खूप महत्वाची कामगिरी केली. २०१९ मध्ये त्यांचे निधन झाले, पण त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते.
कांचन चौधरी मूळच्या हिमाचल प्रदेशातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होत्या. त्यांनी अमृतसरमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि दिल्ली विद्यापीठाच्या आयपी कॉलेजमधून इंग्रजी विषयात एमए केले. त्यांनी १९७३ मध्ये आयपीएस परीक्षा दिली आणि देशातील दुसऱ्या महिला आयपीएस बनल्या. त्यांच्या वडिलांवर झालेला अन्याय कांचन व त्यांची बहीण कविता यांनी डोळ्यांसमोर पाहिला होता. म्हणून दोघींनी आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखवायची शपथ घेतली. त्यांची बहीण कविता चौधरीने 'उडान' मालिकेद्वारे तिच्या वडिलांवरील झालेला अन्याय संपूर्ण देशाला दाखवला, तर कांचन चौधरी यांनी आयपीएस अधिकारी बनून पोलिसात नाव कमावले. कांचन यांच्या कामाची प्रेरणा कविता यांना दूरदर्शनच्या 'उडान' मालिकेसाठी मिळाली होती. १९९० मध्ये कविता यांनी स्वतः त्या मालिकेत काम केले होते.


