पॅलेस्टिनी विस्थापित, न उलगडलेल्या चार खुनांचा मास्टरमाईंड ते अमेरिकेन कोकेन माफिया- एडी नॅशची गोष्ट काय आहे?

लिस्टिकल
पॅलेस्टिनी विस्थापित, न उलगडलेल्या चार खुनांचा मास्टरमाईंड ते अमेरिकेन कोकेन माफिया- एडी नॅशची गोष्ट काय आहे?

इस्राईलच्या स्थापनेनंतर १९५० मध्ये पॅलेस्टाइनवरून अमेरिकेत आलेल्या एका विस्थापिताने अवघ्या वीस वर्षात ३ कोटी डॉलर्सची संपत्ती कमावली. अमेरिकेत त्याच्या मालकीचे कितीतरी हॉटेल्स आणि नाईटक्लब्ज होते. पॅलेस्टाइनमधून विस्थापित होऊन आलेल्या या तरुणाचे नाव होते एडी नॅश! या एडी नॅशला नंतर अमेरिकेतल्या एका भयानक खून खटल्याचा मास्टरमाइंड म्हणूनही ओळखले गेले. पण त्यातून तो सही सलामत बाहेर पडला. अमेरिकन सरकार आणि पोलिसांना सतत चकवा देणारा हा एडी नॅश होता तरी कोण? विस्थापित म्हणून येताना ज्याच्या जवळ दहा पेनीपेक्षा जास्त रुपये नव्हते, त्याने अवघ्या वीस वर्षांत ३ कोटी डॉलर्सची संपत्ती कुठून आणि कशी जमवली? यामागचे गौडबंगाल काय? जाणून घेऊया या लेखातून.

पॅलेस्टाइनमधील रामल्लाह येथे जन्मलेल्या एडी नॅशचं खरं नाव होतं ॲडेल घरीब नासरल्लाह. हा एका श्रीमंत कुटुंबातून आला होता. ३ एप्रिल १९२९ रोजी एडीचा जन्म झाला. पॅलेस्टाइनमध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची एकूण ४८ हॉटेल्स होती. पण इस्राईलच्या स्थापनेनंतर एडी आणि त्याच्या कुटुंबियांना विस्थापितांच्या छावणीत आसरा घ्यावा लागला. इस्राईल सैनिकांनी त्याच्या मेव्हण्याची हत्या केल्यानंतर एडी कसाबसा तिथून निसटला आणि अमेरिकेत पोहोचला. अमेरिकेत आल्यानंतर त्याने हॉटेलमध्येच नोकरी सुरू केली. काही काळ त्याने फिल्म इंडस्ट्रीमध्येही नशीब आजमावले. छोटेमोठे रोल मिळत होते, पण एडी त्यात खूष नव्हता. शेवटी त्याने लॉस एंजिल्सच्या हॉलीवूड बुलवर्ड या प्रसिद्ध रस्त्यावर एक छोटासा खाऊचा गाडा सुरू केला. यातूनच पुढे तो नाईटक्लब मालकाच्या संपर्कात आला आणि १९७० पर्यंत त्याने लॉस एंजिल्समधील अनेक नाईटक्लब स्वतःच्या मालकीचे करून घेतले. याच काळात तो कोकेन डीलिंगही करू लागला. यातून त्याला मोठ्या प्रमाणात नफा होत होता. कोकेन सप्लायच्या या बिझनेसमधूनच त्याची ओळख त्याकाळचा प्रसिद्ध पॉर्नस्टार असलेल्या जॉन होम्सशी झाली.

जॉन होम्स कोकेनच्या अत्यंत आहारी गेल्याने त्याचे काम सुटले होते आणि डोक्यावर कर्जाचे ओझे वाढले होते ते वेगळेच. त्याच्या व्यसनासाठी त्याला अनेक चुकीची कृत्ये करावी लागत होती. लॉस एंजिल्स विमानतळावरून लगेज चोरणे, कार चोरणे आणि वंडरलँड गँगला ड्रग्ज पुरवणे अशी कितीतरी धोकादायक कामे तो करत असे. त्याच्या व्यसनामुळे लॉस एंजिल्सच्या ड्रग पुरवणाऱ्या वंडरलँड गँग्जचे त्यांच्यावर भरपूरच कर्ज झाले होते.

एडी नॅश आणि वंडरलँड गँग्जमध्ये मोठी चुरस होती. होम्स वंडरलँड गँग्जसाठी काम करतो हे नॅशला माहिती होते. तरीही त्याने होम्सशी मैत्री टिकवून ठेवली होती. कारण तो नॅशला देखील कधीकधी चोरीचा माल पुरवत असे आणि कोकेनही पुरवत असे. दोघांचे संबंध यामुळे आणखीनच घट्ट बनले होते.
वंडरलँड गँग्जकडून घेतलेल्या कर्जात होम्स अगदी गळ्यापर्यंत बुडाला होता. या गँगचा लीडर रॉन लेनियस त्याच्या मागे हात धुवून लागला होता. आपले कर्ज फेडण्यासाठी म्हणून होम्सला एक विचित्र कल्पना सुचली. त्याने रॉनला सांगितले की त्याचा मित्र एडी नॅश खूप श्रीमंत आहे आणि त्याच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. वंडरलँडच्या गुंडांनी जर त्याच्या घरावर दरोडा टकला तर त्यांना खूप पैसा मिळेल. यासाठी होम्सने वंडरलँडच्या गुंडांना मदत करण्याचीही तयारी दर्शवली.

२९ जून १९८१ रोजी सकाळी होम्स नॅशला भेटायला गेला आणि परतत असताना त्याने घराचा दरवाजा तसाच उघडा सोडला. जेणेकरून तो बाहेर पडताच वंडरलँडचे गुंड नॅशच्या घरात घुसू शकतील. तो बाहेर पडताच पोलीसासारखे कपडे घातलेले दोन लोक नॅशच्या घरात घुसले आणि त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्याला धमकावायला सुरुवात केली. नॅशला वाटले ते खरोखरचे पोलीस आहेत. म्हणून त्याने "वाटेल ती किंमत घ्या, पण मला सोडा" अशी विनंती करण्यास सुरुवात केली. त्याच्या या परिस्थितीचा फायदा घेऊन गुंडांनी त्याच्या घरातून १ कोटी डॉलरहून जास्त रोख रक्कम, ड्रग्ज, दागिने आणि हत्यारे हडप केली.

होम्स येऊन गेल्या गेल्याच ही भयानक घटना घडल्याने नॅशला होम्सचा संशय आला आणि दोनच दिवसात त्याचा संशय पक्का असल्याची खबर त्याला मिळाली. त्याच्या कुठल्यातरी माणसाकडून त्याला कळाले की, नॅशच्या घरात त्या दिवशी घुसून त्याची संपत्ती लुटून नेणारे पोलीस नसून वंडरलँड गँगचे गुंड होते आणि होम्स त्यांना शामिल होता, कारण चोरी करून नेलेल्या दागिन्यांतील काही दागिने घालून होम्स शहरातून फिरताना दिसत होता.

मग नॅशने याचा पद्धतशीर काटा काढण्याचा प्लॅन तयार केला. त्याने आपले काही गुंड आणि होम्स यांना वंडरलँड गँगच्या अलिशान बंगल्यात पाठवले. होम्सच्या हातात जबरदस्तीने एक गन देण्यात आली. त्या वेळी त्या घरात उपस्थित असलेल्या पाच लोकांना या गुंडांनी अशी काही मारहाण केली होती की पाहणाऱ्याच्या काळजाचा थरकाप उडेल. होम्सकडूनही त्यांनी दोन तीन गोळ्या चालवून घेतल्या होत्या. वंडरलँडचा तो अलिशान बंगला रक्ताच्या थारोळ्यात न्हाऊन निघाला होता. तिथे चार मृतदेह अशा अवस्थेत पडले होते की कुणाला त्यांची ओळखही पटणार नाही. वंडरलँड गँगचा लीडर रॉन लेनीस, त्याचा साथीदार जॉय मिलर, त्याची प्रेयसी बिली डेव्हरेल, त्यांची आणखी एक मैत्रीण अशा चौघांचे मृतदेह तिथे पोलिसांना सापडले. लेनीसची बायको यातून कशीबशी बचावली. पण तिच्या मेंदूला जबरदस्त मार लागला होता.

होम्सवर संशय घेऊन पोलिसांनी होम्सला अटक केली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याने या सगळ्यात नॅशचा हात असल्याचे आणि आपला काहीच दोष नसल्याचे ओरडून सांगितले. पण सगळे पुरावे त्याच्या विरोधात होते. नॅशने त्याला यात पुरता गुंतवला होता. १९८२ साली त्याला या चार खुनाबद्दल शिक्षा सुनावण्यात आली. नॅशवरही या खुनाचे आरोप लावण्यात आले होते. मात्र न्यायाधीशांनाच लाच चारून तो या खटल्यातून सुखरूपपणे निसटला होता.

१९८८ साली होम्सचे निधन झाले. त्याच्या मते त्याने आपल्या आयुष्यात नॅशसारखा कपटी माणूस दुसरा कुणी पहिला नव्हता. या खून खटल्याचा माग काढता काढता पोलिसांना नॅशच्या कोकेन स्मगलिंगबद्दलही समजले आणि त्यासाठी पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली, पण त्याच्याकडे कोकेन ऐवजी डांबराच्या गोळ्या सापडल्या.\

२००० साली त्याला पुन्हा एकदा ड्रग्जचा व्यवसाय, मनी लॉंडरिंग, लाच देणे, खून अशा गुन्ह्यात अटक करण्यात आली. पण एकच वर्ष तुरुंगात राहून तो पुन्हा परतला. "वंडरलँडच्या गुंडांनी माझ्या घरावर दरोडा टाकला होता, ती रक्कम परत आणण्यासाठी मी माझे माणसे पाठवली होती, पण त्यांना तिथे जाऊन खून करण्यास सांगितले नव्हते", अशी पलटी मारत त्याने या खुनाचे आरोप फेटाळून लावले.

९ ऑगस्ट २०१४ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी एडीचा मृत्यू झाला. अनेक गुन्हे करूनही शेवटपर्यंत तो पोलि‍सांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला.

साम, दाम, दंड, भेद अशा सर्व प्रकारचा वापर करूनच एडीने पॅलेस्टिनी विस्थापित ते अमेरिकेतली एक कोकेन माफियापर्यंतचा प्रवास पूर्ण केला होता.

मेघश्री श्रेष्ठी