माणसाच्या चुकीमुळे कधीकधी प्राण्यांच्या जीवावर बेतण्याच्या बातम्या वाचल्या ऐकल्या असतीलच. कधी कुठल्या कासवाच्या नाकात स्ट्रॉ जाते, पक्ष्यांचे पाय किंवा माशांच्या गळ्यांना मासेमारीच्या जाळ्यांचा फास बसतो.. एक न दोन!! पण अनेकांना आपण केलेली छोटीशी कृती एखाद्या प्राण्यासाठी किती त्रासदायक ठरू शकते याचा अंदाजच नसतो. आता हेच बघा ना, कोलोरॅडोच्या जंगलात एक लहान सांबराच्या गळ्यात एक चारचाकी वाहनाचे टायर अडकले होते. तब्बल दोन वर्षांनी ते मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनी काढण्यात आले. तोवर त्या पिल्लाची किती आबाळ झाली असेल याची कल्पनाही नको. या सांबाराची आणि त्या गळ्यात अडकलेल्या टायरची गोष्ट पाहूयात काय आहे..
वन-अधिकाऱ्यांना २०१९मध्ये पहिल्यांदा हे सांबराचे पिल्लू गळ्यात टायर अडकलेल्या अवस्थेत दिसले होते. त्याला पकडून गळ्यात अडकलेले ते टायर काढणे खूपच गरजेचे होते. नाहीतर त्या सांबराला त्यामुळे इजा होणार हे निश्चित होते. पण,त्याला पकडायचे कसे हा प्रश्न होता. जंगलात ठिकठिकाणी लावलेल्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यांत अनेकदा ते पिल्लू दिसून आले होते. पण त्याला पकडायला जायचा अवकाश, ते तिथून कुठे तरी दूर गेलेले असायचे. दोन वर्षे कोलोरॅडोचे वन-अधिकारी त्या सांबरावर लक्ष ठेवून होते, पण ते पिल्लू काही केल्या हाताशी लागत नव्हते.




