डव्हची #StopTheBeautyTest मोहिम!! त्यांना याद्वारे नक्की काय संदेश द्यायचा आहे?

लिस्टिकल
डव्हची #StopTheBeautyTest मोहिम!! त्यांना याद्वारे नक्की काय संदेश द्यायचा आहे?

वधूवर सूचक मंडळ छापाच्या जाहिरातींत अजूनही एक अपेक्षा कायम असते. ती बऱ्याचदा लिहिलेलीही असते-"गोरी मुलगी हवी"!! तसं पाहायला गेलं तर आजही आधुनिक भारतात लग्न करायचे म्हणल्यास मुलीला तिच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत न्याहाळले जाते. मुलाकडचे आणि त्याच्या घरचे मोठा फौजफाटा घेऊन येतात. त्यातला प्रत्येक जण मुलगी आली की तिच्यासमोर तिच्या दिसण्याविषयी चर्चा करतो. तिचा रंग, उंची, जाडी, अंगावर काही डाग यावर बोलले जाते. तिचे शिक्षण, स्वभाव, छंद , महत्वकांक्षा, स्वप्नं या गोष्टी कोणी विचारातही घेत नाही. सौन्दर्य हे फक्त दिसण्यावर ठरवणाऱ्या विचारांनी ग्रासलेला समाज कधी बदलेल का? यासाठीच पहिले पाऊल टाकले आहे डव्हने. त्यांचे #StopTheBeautyTest या मोहिमेद्वारे केलेल्या सर्वेक्षणात अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे.

हंसा रिसर्चने केलेल्या आणि डव्हने केलेल्या स्वतंत्र सर्वेक्षणात भारतातील १० पैकी ९ अविवाहित महिलांना वाटते की लग्न ठरवताना जो दाखवण्याचा कार्यक्रम होतो, त्यात त्यांना फक्त दिसण्यावर नाकारले जाते आणि ते खूप अन्यायकारक आहे. हा नकार त्यांच्या स्वाभिमान आणि आत्मविश्वासावर परिणाम करतो. 68% महिलांनी असा दावा केला की त्या नकारामुळे त्यांच्या स्वाभिमान आणि आत्मविश्वासावर खोलवर परिणाम होतो. तसेच एक प्रकारची नकारात्मकता येते आणि काहीजणींना नैराश्याचा (डिप्रेशन) सामनाही करावा लागला आहे. डिसेंबर २०२० मध्ये १८ ते ३५ वयोगटातल्या १०५७ महिलांची ऑनलाइन प्रश्नावलीद्वारे भारतातील १७ शहरांमधून मुलाखत घेण्यात आली होती. त्यात असे आढळले की प्रत्येक स्तरातील महिलांना अशा गोष्टींना किंवा अशा प्रकारच्या नकाराला सामोरे जावे लागते. कधी रंग काळा आहे, उंची खूप जास्त किंवा बुटकी आहे, अंगावर एखादा डाग आहे, केस लांब नाहीत, चष्मा आहे अशा एक ना अनेक गोष्टी त्यांच्या नकाराला कारणीभूत ठरल्या आहेत. याचा प्रचंड सामाजिक दाब मुली आणि त्यांच्या कुटुंबावर असतो. मग भले ती कितीही उच्चशिक्षित असो, तिचे कौशल्य किंवा कामगिरी कितीही चांगली असो फक्त दिसण्यावर त्यांना नकार दिला जातो. याचा थेट परिणाम त्यांच्या स्वाभिमानावर होतो.

डव्हने एका शॉर्टफिल्मद्वारे या अश्या सौन्दर्य चाचणीमुळे कसे परिमाण होतात याचा संदेश दिला आहे. ६३१ दशलक्ष महिलांच्या देशात, सौंदर्याच्या एका व्याख्येला चिकटून राहण्यासाठी इतका तीव्र दबाव असणे दुर्दैवी आहे. म्हणून त्या दिशेने एक पाऊल टाकत #StopTheBeautyTest ही मोहीम चालू केली. याद्वारे अशा अन्यायकारक सौंदर्य चाचण्या करून महिलांना नकार देणे थांबवले पाहिजे असा महत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. डव्ह यासाठीच अग्रगण्य वैवाहिक प्लॅटफॉर्म शादी डॉट कॉम यांच्यासह भागीदारी करत आहे. मॅचमेकिंग प्रक्रिया ही फक्त शारिरीक सौंदर्र्या पुरती नसावी असा त्यांचा प्रयत्न आहे.

हे बदल लगेच होणे अशक्य आहे. परंतु या दिशेने समाजाने पाऊल उचलणे खूप महत्वाचे आहे.मुलांनी किंवा पुरुषांनी " अशीच बायको हवी " असे सांगताना या बाबी विचारात घेणे गरजेचे आहे, नाही का?

शीतल दरंदळे