एमिलीयानो सापाता (Emiliano Zapata) हे नाव आपल्याकडे फारसं कुणाला माहीत नसेल, पण मेक्सिकोमधील शेतकऱ्यांसाठी हा मनुष्य जणू देवासमान आहे. सापाता हा मेक्सिकन क्रांतीचा खराखुरा नायक. श्रीमंत जमीनदारांच्या विरोधात उठाव करून त्याने गरीब शेतकऱ्यांना त्यांनी गमावलेल्या जमिनी परत मिळवून दिल्या.
सापाताचा जन्म १८७९ मध्ये मेक्सिकोच्या एका खेड्यातला. त्याचे वडील शेतकरी होते. जोडीला ते घोड्यांना प्रशिक्षण देण्याचं आणि त्यांची विक्री करण्याचं काम करत. लहानपणी त्याने आजूबाजूच्या गरीब खेडूत शेतकऱ्यांकडून त्यांच्या जमिनी बळकावणारे श्रीमंत जमीनदार बघितले. त्यात त्याच्या शेजारीपाजारी राहणारी बरीच कुटुंबं होती. त्याने या लोकांना जमीनदारांच्या विरोधात एकत्र केलं आणि त्यांच्याशी लढण्यासाठी उद्युक्त केलं. त्याने स्वतः या उठावाचे नेतृत्व केलं. या कृत्याची शिक्षा म्हणून त्याला जबरदस्ती लष्करात भरती केलं गेलं. सहा महिने तो तिथे होता. लष्करातून बाहेर पडल्यानंतर पडल्यानंतर सापाताने परत एकदा पूर्वीचे उद्योग सुरू केले आणि बंडखोर गावकऱ्यांना एकत्र केलं. आता हे गावकरी सरळसरळ जमीनदारांवर हल्ले करू लागले आणि बळाचा वापर करून आपल्या जमिनी त्यांच्याकडून परत घेऊ लागले.



