दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चीन ते म्यानमार या भागात अनेक लढाऊ विमाने कोसळली होती. जपानी फौजांविरुद्ध लढताना ही अमेरिकन विमाने भारतातील हिमालयावरून जात असताना वादळी वारे, हिमवर्षाव अशा कारणांनी खराब होत आणि ती या भागात कोसळत. याच काळात हिमालयीन भागात पडलेले एक विमान तब्बल ७७ वर्षांनी शोधण्यात यश आले. हे विमान शोधण्यासाठी एक स्वतंत्र मोहीम सुरु होती. हे शोधकार्य सुरू असताना ३ गाईड मृत्युमुखी पडले. यावरून या शोधमोहिमेतली जोखीम लक्षात येऊ शकते.
१९४५ साली जानेवारीत हिमालयातील अरुणाचल प्रदेश भागात हे विमान पडले होते. विमान C - ४६ प्रकारातले लढाऊ विमान होते. चीनमधील कँमिंग भागातून हे C - ४६ विमान १३ लोकांना घेऊन जात असताना पडले. या अपघातात कोणीही वाचू शकले नव्हते. अपघात झाल्यावर कोणी सापडणे तर सोडाच, पण विमानाचे अवशेषही सापडले नव्हते. आता इतकी वर्षं लोटल्यावर ते विमान सापडले. या विमानात असलेल्या एका अधिकाऱ्याचा मुलगा बिल शेरर यांनी क्लेटन कुहल्स हा अमेरिकी धाडसी ट्रेकरला हे विमान शोधण्याचे काम सोपवले होते.

