चहा!
भारतीय संस्कृतीमध्ये पाहुण्यांचे आदरातिथ्य करताना पूर्वी गूळाचा खडा आणि पाणी द्यायची पद्धत होती. काळानुसार यात बदल होऊन गुळाच्या खड्याची जागा चहाने घेतली आहे. आल्यागेल्याला चहा दिलाच पाहिजे ही पध्दत रूढ झाली. पूर्वी धारोष्ण दूध पिऊन तब्येत ठणठणीत ठेवणारांसाठी नुकताच आदरातिथ्यात घुसलेला चहा म्हणजे नवीन पिढीचे चोचले होते. चैन होती. तोच चहा आता ‘गरज’ झाला आहे. दिवसाची सुरुवात चहाने झाली नाही तर दिवस आळसावल्यासारखा जातो असे मानणारे चहाप्रेमी वाढत आहेत. चहा हे उत्तेजक पेय आहे आणि त्याने शरीराची हानी होते हे सप्रमाण सिद्ध करू पाहणारांकडे हे चहानिष्ठ सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. खरं तर चहा प्रतिष्ठेचा निकष ठरत आहे. फिटनेस फ्रीक मंडळींसाठी ग्रीन टी, लेमन टी बाजारात आले आहेत. दूध, चहापत्ती, साखर टाकून उकळलेला चहा शरीरावर कसा दुष्परिणाम घडवून आणतो याचा जोरदार प्रचार होऊनही चहाच्या गंधाने बेभान होणारे, कोसळणाऱ्या पावसात गरमागरम चहाचा घोट घेताच ‘आहा ssss’ असा उद्गार काढणारे, चहाला ‘अमृत’ मानणारे रसिक जोवर आहेत तोवर चहा भारत काय, जगातून नष्ट होणार नाही हे खरंच! चला बघू या, अवघ्या जनमाणसाचे जनजीवन व्यापून टाकणाऱ्या चहाचा इतिहास!
ख्रिस्तपूर्व २७३७ मध्ये चीनचा सम्राट शेन नंग याने कैमेलिया सिनेंसिस या वनस्पतीची पाने उकळत्या पाण्यात टाकून पहिलावहिला चहा बनवला होता असे म्हणतात. त्यानंतर त्याचा प्रसार होऊन तो चीन, भारत, श्रीलंका, जपान, कोरिया, तैवान, तुर्की या देशांच्या संस्कृतीचा देखील अविभाज्य भाग झाला. आपल्या जगण्याचाच भाग झालेल्या या चहासाठी तुमच्या उत्पन्नाचा किती भाग खर्च करायची तुमची तयारी असते?
एक कटिंग चायसाठी पाच किंवा दहा रूपये मोजाणाऱ्याला ताजसारख्या हॉटेलमध्ये एक कप चहासाठी पाचशे रूपये मोजावे लागतात हे समजले की भोवळ येते. चवीशी तडजोड नको म्हणून कितीही चोखंदळपणा दाखवत वाणसामान भरताना तुम्ही कितीही महागड्या किमतीची चहा पत्ती घेतली तरी जास्तीत जास्त महाग चहा किती किंमतीचा असू शकेल याचा तुम्हाला अंदाजही नसेल. चला बघू या, तुमचे डोळे पांढरे होतील अशा चहाच्या काही किंमती.




