४ ऑक्टोबर २०२१, रात्री सव्वानऊच्या आसपासची वेळ. अचानक त्याने पाठवलेलं व्हाट्सएप्प मेसेजेस जाणे बंद झाले, टाईमपास करण्यासाठी म्हणून ती व्यक्ती इंस्टाग्रामकडे वळली, पण तिथेही एरर येत होता. फेसबुकसुद्धा बंद!!. एकूणच काय, ज्या गोष्टी त्याच्यासाठी महत्वाच्या होत्या त्या सगळ्या बंद पडल्या होत्या. त्याने आपलं वाय-फाय बंद केलं आणि जियोचं इंटरनेट वापरुन पाह्यलं. राऊटर रिस्टार्ट केला, फोन बंद करून चालू केला. तरीही काहीच चालत नव्हतं. त्याने मग शेवटी गुगल करून बघितलं तेव्हा त्याला कळलं जगातल्या सगळ्यांसाठी फेसबुक आणि त्याच्या इतर सेवा बंद पडल्या होत्या. तुमच्या सोबत असेच घडलं होत का? का हे सगळं बंद बघून तुम्हाला एकदम शांत वाटत होते? एकूणच हे का घडलं ते समजावून घेऊया.
हे समजावून घेताना आधी आपण सगळ्या कॉन्स्पिरसी थिअरीजचा विचार करूया. आपल्याकडे एखादी घटना घडली की लगेच ती घटना म्हणजे अमुकतमुकनी केलेलं कारस्थान आहे अशा वावड्या उडायला सुरुवात होते. अर्थातच वावड्या किंवा अफवा वजनानी हलक्या असल्यामुळे त्या पसरायला वेळ लागत नाही. काल असंच झालं. लोकांचं व्हॉट्सॅप बंद पडलं आणि त्यांनी हे ' शाहरुख खानने केलेलं - घडवून आणलेलं पेड कारस्थान आहे' असं म्हणायला सुरुवात केली. काहीजण इंटरनॅशनल कारस्थानांचे पतंग उडवतात त्यांचं म्हणणं असं होतं की 'काल फेसबुक लोकांच्या आरोग्याची चिंता न करता पैसे कमवायच्या मागे असतं हे उघडकीला आल्यामुळे फेसबुकनेच खुन्नस काढली'!!
आता असं काही म्हणण्यापूर्वी फॅक्ट-चेक हा प्रकार कोणीही करत नाही. पण आमचे लेख म्हणजे 'सच्चा बोभाटा' असतो त्यामुळे कालचा लोचा कसा तांत्रीक गडबडीने झाला होता हे आम्ही आज उलगडून सांगणार आहोत
अजून फेसबुकने याचे कारण जाहीर केलं नसले तरी प्राथमिक माहितीत आपल्या समोर आलं आहे कि फेसबुकच्या BGP ( बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल) मध्ये लोचा झाला होता. आता हे काय असते ते सोप्या भाषेत समजावयाला बोभाटा आहे ना!


