सीता और गीता, चालबाज, जुडवा या सारख्या ‘डबल रोल’ चित्रपटात तुम्ही एकमेकापासून दूर गलेल्या जुळ्या भावांची किंवा बहिणींची गोष्ट पाहिली असेल. जुळ्या भावंडावर आधारित चित्रपट म्हटले की त्यांचे एकमेकापासून अलग होणे आणि मग त्यांची नाट्यमय रीतीने भेट होणे हे ठरलेलेच सूत्र. अशीच एक सत्य कथा न्यूयॉर्कमध्ये घडली, पण याचा शेवट काही वेगळाच होता. महत्वाचे म्हणजे इथे फक्त जुळे नाही तर तिळे होते. डेव्हिड, बॉबी आणि एडी या तिळ्यांची ही कथा म्हणजे निव्वळ नियतीने घडवून आणलेला योगायोग नव्हता. तर एका मानवी प्रयोगाची कृती होती. काय होता हा प्रयोग आणि त्याचा या तिळ्यांशी काय संबंध जाणून घ्यायचे असेल तर हा संपूर्ण लेख नक्की वाचा.
बॉबीने न्यूयॉर्क मधील सुलीव्हीयन कम्युनिटी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले होते. कॉलेजचा पहिलाच दिवस होता. कॉलेजचे वातावरण एकदम नवीन तरीही कुणा तरी अनोळख्या व्यक्तीने बॉबीला एकदम ओळखीचा असल्यासारखी हाक मारली. सुरुवातीला बॉबीला वाटले काही तरी चूक झाली असेल ओळखण्यात तसेही एक सारख्या दिसणाऱ्या या जगात सात व्यक्ती असतात असे म्हटले जाते. पण हा काही अपघात नव्हता हे लवकरच त्याच्या लक्षात आले. कारण कुणी एकच व्यक्ती नाही, तर बरेच जण त्याला अशीच ओळख दाखवू लागले आणि त्याला बॉबी ऐवजी एडी नावाने हाक मारू लागले. तेव्हा एकेदिवशी त्याने त्या ग्रुपमधील एका मुलाला विचारलेच की, तुम्ही मला एडी का म्हणता? माझे नाव तर बॉबी आहे,” तेव्हा त्याला खुलासा झाला की एडी नावाचा कुणी मुलगाही अगदी सेम टू सेम त्याच्यासारखाच दिसतो म्हणून ते त्याला एडी म्हणतात. आता बॉबीला कधी एकदा एडीला भेटतोय असे झाले होते आणि दोघेही जेव्हा एकमेकांसमोर आले तेव्हा दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला.




