खुल्या अर्थव्यवस्थेत ज्यांना आपण पैशांचे डॉक्टर म्हणून ओळखतो त्या 'सीए’ म्हणजेच ‘चार्टर्ड अकाऊंटंट्स’ (Chartered Accountants) चा आज दिवस. १ जुलै १९४९ साली ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया’ (आयसीएआय) या भारतीय व्यावसायिक लेखा संस्थेची स्थापना झाली म्हणून हा दिवस ‘सीए दिन’ म्हणून साजरा केला जातो.
सर्व प्रकारच्या व्यवसायात, आर्थिक क्षेत्रात, खाजगी, सार्वजनिक क्षेत्रात सीए आज कार्यरत आहेत. आपल्या वाचकांपैकीजण लोक सीए असतीलही. पण आपल्या सर्वांनाच या क्षेत्राविषयी पूर्ण माहिती असते असं नाही. कारण अकाउन्ट् आणि आर्थिक उलाढालीत कोणाला तेवढा रस असणार? काहींना हे काम बोरिंग देखील वाटू शकतं, पण हे काम तेवढंच महत्वाचं आहे मंडळी.
आज आम्ही तुम्हाला या क्षेत्रातील काही रंजक गोष्टींची ओळख करून देणार आहोत. पैशांच्या डॉक्टरांच्या काही माहित नसलेल्या गोष्टी.
१. CA चा लोगो.
हा लोगो तयार केलाय ‘नॅशनल इंस्टीट्युट ऑफ डिझाईन’ (NID) यांनी. २००७ साली हा लोगो अधिकृत रित्या ICAI ने स्वीकारला. लोगोत दिसणाऱ्या CA या शब्दाचा निळा रंग कॉर्पोरेट कलर म्हणून ओळखला जातो, ज्याचा अर्थ सर्जनशीलता, नावीन्यता, ज्ञान, एकाग्रता, विश्वास आणि स्थिरता असा होतो.
हिरव्या रंगात केलेली ‘टिक’ ही सीएंची खासियत आहे. व्यवसायाचे ज्ञान आणि मूल्य दर्शविण्यासाठी ही खास ‘टिक’ लोगोमध्ये सामील करून घेण्यात आली आहे. हा हिरवा रंग म्हणजे वाढ, सुसंवाद, समृद्धी आणि नावीन्यतेचं चिन्ह म्हणून ओळखला जातं.
२. ब्रीद वाक्य.
‘य एष सुप्तेषु जागर्ति’ हे ICAI चं ब्रीदवाक्य आहे. ‘असा माणूस जो झोपी गेलेल्यांना जागं करतो’ हा या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे. कंठोपनिषदातील हे वाक्य श्री अरबिंदो यांनी १९४९ च्या स्थापनेच्या दिवशी ICAI ला ब्रीदवाक्य म्हणून दिलं.
३. देशातील प्रथम सीए होणारी व्यक्ती आणि पहिली महिला सीए.
जी. पी. कपाडिया हे देशातील पहिले सीए होते. ICAI अंतर्गत रजिस्टर झालेले पहिले चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून जी. पी. कपाडिया ओळखले जातात. १९४९ ते १९५२ पर्यंत ते ICAI चे अध्यक्ष देखील होते.
स्रोत
पहिली महिला चार्टर्ड अकाऊंटंट होण्याचा मान ‘आर. सिवभोगम’ यांना मिळाला. त्याकाळातील समजुतीनुसार सीए हे पुरुषांचं क्षेत्र म्हणून ओळखलं जायचं, पण तरीही त्यांनी या क्षेत्रात येत हा मान पटकावला.
४. नावापुढे CA लावणं.
डॉक्टरची ओळख म्हणजे त्याच्या नावापुढील Dr. पण चार्टर्ड अकाऊंटंट ओळखण्यासाठी तसा कोणता मार्ग नव्हता. २००६ साली ICAI ने चार्टर्ड अकाऊंटंट्सला खास ओळख निर्माण व्हावी म्हणून नवा पुढे CA लावण्याचा निर्णय घेतला.
५. सर्वात तरुण सीए.
‘निश्चल नारायणम’ हा सीए ची परीक्षा उत्तीर्ण होणारा सर्वात तरुण सीए आहे. २०१५ साली त्याने परीक्षा पास केली त्यावेळी त्याचं वय अवघं १९ वर्ष होतं. त्याचं वय २१ वर्षावेक्षा कमी असल्याने त्याला त्यावेळी ICAI चा मेंबर होता आलं नाही.
६. नो रिजर्वेशन
मंडळी ICAI मध्ये आरक्षण नाही. त्यामुळे इथे फक्त आपल्या मेहनतीवर आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही येऊ शकता. ही या संस्थेची जमेची बाजू म्हणता येईल.
राव पडली का ज्ञानात भर ?




