सिरीजचे स्क्रिप्ट इतके तंतोतंत आणि जलद पुढे जात राहते की आपण थक्क होतो. आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती, त्यातले डावपेच, काश्मिरी जनतेचा संघर्ष, दहशतवाद्यांच्या कारवाया, पाकिस्तानची त्यांना असलेली फूस, सौदी अरेबियाशी असलेले लागेबांधे आणि या सगळ्यांचा तपास लावण्यासाठी अथकपणे लढणारा खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सीतील शूरवीर, बुद्धिमान व प्रसंगावधानी अधिकारी श्रीकांत तिवारी हा या कथेचा नायक आहे. त्याचे त्याच्या कुटुंबावर अत्यंत प्रेम आहे . तो सतत त्यांचे हित चिंतणारा असला तरी कुटुंबातले सदस्य मात्र त्याच्यावर नाराज आहेत. कारण त्यांच्यासाठी पुरेसा वेळ देणे त्याला शक्य होत नाही. त्याच्या ऑफिसच्या कामांमध्येच तो इतका बुडालेला असतो की त्याचे आरोग्यही त्याने अगदी पणाला लावलेले असते .
श्रीकांतची बायको कॉलेजात शिकवते. त्यांचा आठनऊ वर्षांचा चतुर व चलाख मुलगा आणि चौदापंधरा वर्षांची स्मार्ट व हुशार मुलगी यांच्या शाळा , अभ्यास , क्लास , छंद हे सगळं एखाद्या मध्यमवर्गीय घरात असते तसे वातावरण... पाहता पाहता संशयग्रस्त होऊ लागते . घरगुती संभाषणांना वेगळेच वळण लागते . घरातले ताणतणाव वाढू लागतात . कामाच्या जागी तर टेन्शन , स्ट्रेस हे सवयीचेच झालेले असतात. त्यातून मार्ग कसकसे काढले जातात , ते प्रत्यक्ष पाहण्यातच मजा आहे. भयंकर हाणामारी व रक्तपाताची दृश्ये ओघात येणे साहजिकच असले तरी अप्रतिम छायाचित्रण, नेमके प्रसंग व अचूक संकलन यांमुळे ते पाहणे फारसे असह्य वाटत नाही. असंख्य पात्रे त्यांचे ओझरते दर्शन असूनही लक्षात राहतात, कारण त्यांचे खास वैशिष्ट्य दाखवणारे क्लोजप्स घेतले आहेत. काश्मीरच्या निसर्गाच्या सुखद सान्निध्यातल्या आतंकवाद्यांच्या क्रूर कारवाया व त्यांचे सांकेतिक भाषेतले निर्दय निष्ठूर बोलणे हा अंतर्विरोध आपल्या हृदयाला भेदून जातो.