कोलकाता आणि विशेषतः तेथील खाद्यसंस्कृती म्हटले की तुमच्या डोळ्यासमोर काय येते? रोशोगुल्ला आणि चमचम? रसकदम? मासे? मिष्टी दोई? आमची खात्री आहे, तुमच्या डोक्यात हेच पदार्थ असणार. या यादीत आता एक पदार्थ असा टाकू,ज्याची तुम्ही फार कल्पनाही केली नसेल. कारण या गोष्टीचा फारसा बोभाटा झालेलाच नाही. पण कोलकात्याचा 'चीज'शी पण खूप जवळचा संबंध आहे.
कोलकाता शहराचा चीजबरोबर असलेला संबंध फार जुना आहे. तेथे चीजच्या नेहमीच्या प्रकारांखेरीज पारसी चीज, ज्युईश चीज, पोर्तुगीज प्रभाव असलेले बंदेल चीज यांचेही अनेक भोक्ते आहेत. या शहराला असलेला ऐतिहासिक वारसा हे याचे मुख्य कारण. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी इराक आणि सीरियामधून आलेल्या बगदादी ज्यूंच्या या शहरात वसाहती स्थापन झाल्या आणि त्यामागून ज्युईश चीज आले. दोनशे वर्षे झाली तरी ते बनवण्याच्या पद्धतीत फरक पडलेला नाही. सांबुसाक नावाच्या पारंपरिक ज्युईश पदार्थामध्ये हे चीज वापरले जाते. हा प्रकार आपल्याकडील समोशाप्रमाणेच. त्याचा आकार बेलच्या आकारासारखा असतो. कोलकात्यामध्ये हा प्रकार आवडीने खाल्ला जातो.




