एक छोटा प्रसंग.
स्थळ आहे अमेरिकेतलं. एका खोलीत एक लहान मूल आहे. आफ्रिकन वंशाचं, अर्थात ब्लॅक. त्याच्यासमोर दोन बाहुल्या ठेवल्या आहेत. दिसायला अगदी सारख्या, फक्त रंगात फरक असलेल्या. एक तपकिरी रंगाची, काळ्या केसांची आणि एक गोऱ्या रंगाची, सोनेरी केसांची. मग त्याला विचारलं जातं, तुला कुठली बाहुली आवडली? तुला कुठल्या बाहुली बरोबर खेळायला आवडेल? कुठली बाहुली तुझ्यासारखी आहे? इत्यादी इत्यादी. त्यावर त्या मुलाने दिलेली उत्तरं मासलेवाईक आहेत. कुठली बाहुली आवडते किंवा कुठल्या बाहुलीबरोबर खेळायला आवडेल, या प्रश्नाला तो गोऱ्या, सोनेरी केसांच्या बाहुलीकडे बोट दाखवतो आणि कुठली बाहुली तुझ्यासारखी आहे यावर तो काळी बाहुली दाखवतो. प्रयोगादरम्यान हेही लक्षात येतं, की गोरी बाहुली छान स्वच्छ आणि मैत्री करायला लायक आहे, तर काळी बाहुली कुरूप, घाणेरडी आहे अशी त्या काळ्या मुलाची समजूत झालेली आहे. तीदेखील वयाची पाच वर्षं पूर्ण होतानाच. प्रयोगाच्या शेवटी तो मुलगा रडत बाहेर जातो.
अमेरिकेत काळे-गोरे या वर्णभेदाचा लहान मुलांच्या मनावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी केलेला हा प्रयोग. त्याचे निष्कर्ष बोलके आहेत. पूर्वापार का यांना तेथे गुलामासारखे वागवण्यात आलो आहे. सार्वजनिक ठिकाणी काळ्यांना गोऱ्यांपासून वेगळे करण्यासाठी, एखाद्या कार्यक्रमात काळ या व्यक्तींना प्रवेश द्यायचा की नाही हे ठरवण्यासाठी त्या काळात अमेरिकेत अनेक विचित्र अशा चाचण्या होत्या. अशीच एक चाचणी म्हणजे ब्राऊन पेपर बॅग टेस्ट.





