जिद्द, मेहनत, चिकाटी या हे सगळं आपण पुस्तकात वाचतो. हे सगळं प्रत्यक्ष आयुष्यात करतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत यांच्यात दिसून येते आणि यासाठी कष्ट घेण्याची तयारीच त्यांना सामान्यांपासून वेगळं सिद्ध करते.
बायकर ‘विनील खारगे’ हा याच फळीतला तरुण. या पठ्ठ्यानं अवघ्या २४ तासात पुणे ते चेन्नई असा प्रवास करून ‘लिम्का वर्ल्ड रेकोर्ड’ मध्ये आपलं नाव कोरलं आहे. आता आपल्या सारख्या सामान्य माणसाला या रेकॉर्डमधलं काय कळणार? पण जरा विचार करा. प्रचंड मोठा हायवे, दुतर्फा हरेक प्रकारच्या सुसाट धावणार्या गाड्या, न थांबता बाईक चालवण्यामुळे येणारा थकवा, ताण आणि अशा परिस्थितीत ताशी १४० ते १५० किमीचा वेग. या नुसत्या विचारानं मनाचा थरकाप उडेल.

पण हा प्रवास त्याने पूर्ण केला कसा ?
आमच्या बोभाटा प्रतिनिधीशी बोलताना विनील खारगे यानं या कामात त्याला आलेल्या अनेक अडचणी सांगितल्या. पहिली आणि मुख्य अडचण म्हणजे स्पाँन्सर. या प्रवासासाठी लागणारा पैसा उभारताना विनीलला मोठ्या दिव्यातून जावं लागलं. शेवटी स्पाँन्सर मिळत नसल्यानं त्यानं लोन काढून आपलं स्वप्न पूर्ण केलं.
या अडचणीनंतर सुरु झाला पुणे ते चेन्नई असा प्रवास. ३० जानेवारी २०१५ रोजी दुपारी ३ वाजता ताथवडे, चिंचवड येथे मारलेल्या पहिल्या किकनंतर विनील हुबळी, बंगळूरु असा प्रवास करत थेट चेन्नईतील वेल्लोर येथे जाऊन पोहोचला. हा अर्धा मार्ग १०६८ किलोमीटरचा होता. यावेळी रात्रीचे ३.२५ वाजले होते. यानंतरची कसोटी होती पुण्याकडे परतीचा प्रवास.
आलेल्या मार्गाने परत प्रवास करत तो ३१ जानेवारी दुपारी ३ वाजून ८ मिनिटांनी परत चिंचवड येथे पोहोचला. या प्रवासात त्याने २४ तासात जवळजवळ अडीच हजार किलोमीटर कापले होते. दुचाकीवरुन कमी कालावधीत सर्वाधिक अंतर कापण्याचा हा नवा रेकॉर्ड विनीलने केला होता.
प्रवासादरम्यान एक मोठी अडचण होती ती म्हणजे टायर फुटणं. वेगामुळे टायर फुटू नये म्हणून विनीलने टायरमध्ये नायट्रोजन वायू भरला होता. त्यामुळे वेग कायम राखण्यात त्याला मदत झाली. याशिवाय एकदा तर प्रत्यक्ष प्रवासादरम्यान त्याचा एक मोठा अपघात होता होता वाचला. यासारख्या संकटातून बाहेर पडून विनीलनं एक नवा विक्रम प्रस्थापित केला. या बद्दल सांगताना विनीलला अंदाश्रू अनावर झाले होते. या कामात पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या धनश्री खारगे या आपल्या पत्नीचं नाव घ्यायला तो विसरला नाही.

भविष्यात काश्मीर ते कन्याकुमारी, पुणे ते सिंगापूर तसंच संपूर्ण भारत भ्रमण ४० ते ५० तासात पूर्ण करण्याचा प्लॅन विनील करत आहे. खरंतर तो असे तब्बल ९ विक्रम करण्याच्या तयारीत आहे.
अशा या जिगरबाज विनीलला बोभाटाचा कडक सलाम.
