काल रात्री किशोरी आमोणकर यांचे निधन झालं. एक अद्भुत आलापीचा अंत झाला. शास्त्रीय संगीताशी ज्यांचा परिचय नाही त्यांच्यासाठी किशोरीताई तशा अनोळखीच. आपल्यातील काहींनी त्याचं ‘सहेला रे’ ही भूप रागातली चीज ऐकली असेल. संगीतातली ‘गानसरस्वती’ असलेल्या किशोरी अमोणकर यांनी चित्रपटासाठी तसं कमीच गायन केलं. ’गीत गाया पत्थरोंने’ आणि ’दृष्टी’ या मोजक्या दोन चित्रपटाला त्यांनी आवाज दिला.
या गाण्याबद्दल स्वतः किशोरी ताई म्हणाल्या होत्या की चित्रपटात गाण्यासाठी त्यांच्या गुरु आणि आई मोगुबाई कुर्डीकर यांनी विरोध केला होता. त्यांनी सरळ सांगून टाकले होते कि "तू जर चित्रपटात गायलीस तर माझ्या दोन्ही तानपुऱ्यांना हात लावायचा नाही".

विरोधानंतरही किशोरी ताई ’गीत गाया पत्थरोंन” या चित्रपटासाठी गायल्या आणि रातोरात हे गाणं लोकांमध्ये प्रचंड प्रसिद्ध झालं. चित्रपटातल्या या दमदार पदार्पणाने प्रस्थापित गायक-गायिकांचे धाबे दणाणले. या नंतर एक अतर्क्य घटना घडली. किशोरीताईंच्या आवाजातील गाण्याच्या ग्रामोफोन रेकॉर्ड कुणीतरी रातोरात विकत घेतल्या आणि ही रेकॉर्ड सामान्य माणसांना मिळणार नाही याची व्यवस्था केली. या कटू अनुभवानंतर किशोरीताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला. अपवाद फक्त दृष्टी या १९९० सालच्या चित्रपटातील गाणं.
किशोरीबाईंच्या सामर्थ्याची भीती इतकी जबरदस्त होती की त्यांचा स्वभाव किती तर्हेवाईक आहे याचे खोटे-नाटे किस्से चित्रपटसृष्टीत पसरवण्याचं काम त्यांच्या हितशत्रूंनी चोख केलं. असाच अनुभव इतर गायिकांनासुद्धा आला.
आपल्या आवाजाने शास्त्रीय संगीताला अजरामर करणाऱ्या गानसरस्वतीला बोभाटाची भावपूर्ण आदरांजली...
