सध्या ए. आर. रेहमानच्या ‘उर्वशी उर्वशी’ गाण्याचं ‘फेमिनिस्ट’ वर्जन सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. या विडीओत पुरुष प्रधान संस्कृतीला धारेवर तर धरलं आहेच, आणि स्त्रीला बुरसट कालबाह्य जुन्या भिंती ओलांडून मोकळा श्वास घेण्याचं आव्हानही केलं गेलं आहे.
मुळात ९०च्या दशकातलं उर्वशी गाणे हे एका पुरुषाच्या नजरेतून होतं. त्या गाण्यात "चार दिन की चांदनी, ये जवानी फँटसी" म्हणत स्त्रीला काहीसं गृहीत धरलं होतं. त्याउलट हे नवीन वर्जन पूर्णपणे स्त्रीच्या नजरेतून गायलं गेलंय.
‘ब्रेकथ्रू इंडिया’ या मानवी हक्कासाठी लढणाऱ्या एनजीओनं हा विडीओ तयार केला आहे. गाण्याचे बोल ब्रेकथ्रूच्या टीमनेच लिहिले आहेत तर शोभा एस. व्ही. आणि सौम्या अग्रवाल या दोघींनी गाणं गायलं आहे. अनिका वर्मा, सविता पाल, शाश्वता नोवा या तीन मुली विडीओत आपल्याला दिसत आहेत.
८ मार्चला येऊ घातलेला जागतिक महिला दिन आणि ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमाला झालेल्या विरोधानंतर हा विडोओ अगदी योग्य वेळी आल्याचं आपण म्हणू शकतो.
विडीओ अपलोड झाल्यानंतर या रिमिक्स अवताराला सोशल मिडीयावर चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे प्रतिसाद मिळाले. काहींना हा विडीओ बिलकुल आवडला नाही तर काहींनी विडीओला डोक्यावर घेतलय.
तुम्हीसुद्धा विडीओ बद्दलचे आपले मत आम्हाला कळवा.
