गेल्याच महिन्यात म्हणजे २०१७च्या फेब्रुवारीमध्ये भारतातल्या पश्चिम घाटात नखाएवढा आकार असलेल्या बेडकाच्या चार नव्या प्रजातींची नोंद झाली.
या सर्व प्रजाती निक्टीबाट्रॅकस या जीन्सशी संबंधित आहेत. हे सर्व बेडूक रात्रीच्या वेळेस फिरतात. त्यामुळं त्यांना रात्रीच्या गडद अंधारात आणि दाट जंगलांत लपून राहता येतं. आपण शाळेत शिकलो ना, बेडकांच्या पायांच्या बोटांत पडदे असतात आणि त्यामुळं त्यांना पोहता येतं. पण या नव्यानं सापडलेल्या बेडकांच्या पायाच्या बोटांच्यामध्ये चक्क हे पडदे नाहीत. आणि गंमत म्हणजे आजूबाजूला ही बेडकं मुबलक प्रमाणात सापडत असली तरी बेडकाच्या दृष्टीनेही अत्यंत छोटा आकार, लपून राहण्याची प्रवृत्ती आणि एखाद्या कीटकासारखा आवाज यामुळे आत्तापर्यंत या प्रजाती सापडल्याच नव्हत्या. दिल्ली विद्यापीठ आणि केरळच्या जंगल विभागातर्फे गेली पाच वर्ष एक संशोधन सुरू आहे. त्या संशोधनातूनच या पश्चिम घाटातल्या वेगळ्या प्रकारच्या बेडकांचा शोध लागलाय.


