मंडळी हल्ली युट्युबचा वापर प्रचंड वाढला आहे (नेट स्वस्त झालंय ना भाऊ). नवीन युट्युब चॅनेल्स येत आहेत, रोजच्या डेली सोपपेक्षा नवीन मसाला पाहायला मिळतोय, व्हायरल व्हिडीओबद्दल तर विचारूच नका. प्रिया प्रकाश फ्रेश उदाहरण आहेच की आपल्यासमोर. एकंदरीत युट्युबचा पसारा वाढला आहे. पण राव, युट्युबची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पहिला वहिला व्हिडीओ कोणता होता? पहिला व्हिडीओ म्हणजे नक्कीच स्पेशल काही तरी असणार... असंच तुम्हाला वाटतं ना? पण सत्य काही तरी वेगळंच आहे.
१४ फेब्रुवारी २००५ रोजी युट्युब अस्तित्वात आलं. म्हणजे यावर्षी युट्युब १३ वर्षाचं झालं आहे. १४ फेब्रुवारीला स्थापन झाल्यानंतर २३ एप्रिल रोजी युट्युबचा पहिला व्हिडीओ आला. या व्हिडीओमध्ये युट्युबच्या संस्थापकांपैकी एक असलेले ‘जावेद करीम’ हे हत्तींबद्दल माहिती देत आहेत. कदाचित त्यांना माहित नसेल की युट्युब पुढे जाऊन काय कमाल करणार आहे, त्यामुळे त्यांनी आपला साधासरळ व्हिडीओ अपलोड केला राव.
या पहिल्या व्हिडीओ चं नाव आहे ‘Me at the zoo’. जावेद यांनी आपल्या ऑफिशियल युट्युब चॅनेल वरून तो अपलोड केला होता. हा व्हिडीओ फक्त १८ सेकंदचा असून आत्तापर्यंत त्याला 46,050,190 लोकांनी बघितलं आहे.
चला तर, तुम्हीसुद्धा बघा युट्युबचा हा पहिला वहिला व्हिडीओ.
