विमान प्रवास एकेकाळी नवलाईची गोष्ट होती. ती ओसरल्यावर त्यामानाने विमानप्रवास करणारे प्रवासी वाढले, साहजिकच त्याप्रमाणात सुरक्षा घटकांत वाढ न झाल्याने विमान अपघाताच्या अनेक घटना घडू लागल्या. दुर्दैवी गोष्ट म्हणजे त्याकाळी विमान अपघातातून कोणीच वाचण्याची शक्यता नसे. आज विमानाचा अपघात जरी झाला तरी वैमानिक आणि प्रवाशांना पॅराशूटच्या सहाय्याने सुखरूपपणे परत येण्याची संधी आहे.
पॅराशूट नसण्याच्या काळात विमान अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या अधिक होती. वृत्तपत्रे आणि रेडिओवरील विमान अपघाताच्या बातम्या ऐकून कुणीही अस्वस्थ होणारच. फ्रांसचा एक सुप्रसिद्ध टेलर फ्रांझ रॅचेलही विमान कोसळल्याने कित्येकांना आपले प्राण गमवावे लागतात हे ऐकून चिंतित झाला होता. यावर काही तरी उपाय शोधला पाहिजे आणि आपण हे करू शकतो असे त्याला वाटले. अर्थात त्याची कल्पना आणि हेतू चांगलाच होता, मात्र त्याचा बेदरकार स्वभाव आणि अतिआत्मविश्वास त्याला असा काही नडला की इतरांचा जीव वाचवण्याच्या हेतूने त्याने बनवलेला पॅराशूट त्याच्यासाठीच काळ ठरला.






