मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे आणि त्यापासून कोणीही सुटू शकत नाही. जेव्हा कोणीतरी मृत होतं, त्यावेळचा प्रसंग अतिशय कठीण असतो. त्यातल्या त्यात आजच्या काळातल्या विभक्त आणि लहान कुटुंबात अशा दुःखाच्या प्रसंगी जास्तच धावपळ होते, गोंधळ उडतो. नेमकी हीच बाब हेरून एका भारतीय तरूणीने आपला आगळावेगळा बिझनेस सुरू केलाय.
हैद्राबादमधली श्रुती रेड्डी नावाची ही तरूणी अंत्यसंस्कारासाठी लागणार्या सर्व सुविधा पुरवते. तिनं सुरू केलेल्या या स्टार्टअप कंपनीचं नाव आहे "अंत्येष्टी फ्युनरल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड." ही कंपनी अंत्यविधीसाठी लागणार्या सर्व सुविधा आणि साहित्य पुरवते. यात अॅम्ब्युलन्स, फ्रिझर, श्राद्ध पूजा, अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. या कामात तिच्यासोबत आणखी चारजण तिला मदत करतात. विशेष म्हणजे श्रुतीच्या कल्पनेला लोकांचाही चांगला प्रतिसाद लाभतोय. मारवाडी, आर्य, बंगाली, बिहारी अशा सर्व समुदायांना श्रुतीची कंपनी सेवा पुरवते. यासाठी त्यांनी २५,००० पासून १,५०,००० पर्यंत पॅकेज उपलब्ध केली आहेत. आणि फ्युनरल सर्व्हिस बुकींगसाठी श्रुती ने वेबसाईटही सुरू केली आहे.

इलेक्ट्रिक इंजिनिअर असलेल्या श्रुतीनं ९ वर्षे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम केलंय. पण काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास घेतलेल्या श्रुतीने आपल्या आजोबांच्या अंत्यसंस्कारावेळी झालेली गैरसोय आणि गोंधळ पाहिला, आणि तिला अशा कंपनीची कल्पना सुचली. सुरूवातीला तिच्या या विचित्र कामाला घरच्यांकडून विरोध झाला खरा, पण आज या सेवेची मागणी वाढली आहे. थोडं विचित्र आणि वेगळं काम वाटत असलं तरी हीसुद्धा काळाची गरजच आहे. तेव्हा श्रुतीच्या या अनोख्या सेवेला सलाम !
