सोशल मीडियावर बायकॉट चायना ट्रेंड चालवत आहात? तर मग थांबाच. तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. टिकटॉकवर इतर कुणी नाही तर चक्क भारत सरकारने अकाऊंट उघडले आहे.
बायकॉट चायना ट्रेंडच्या दिवसांत चक्क भारत सरकारचंच टिकटॉकवर अकाऊंट आहे? काय पोस्ट केलं जातं तिथे?


गेल्या काही दिवसांपासून टिकटॉक आणि टिकटॉकर्सचे दिवस फिरले आणि आख्खा देश यांच्या मागे हात धुवून लागला असे चित्र निर्माण झाले. टिकटॉकर्सना रोस्ट करण्याचा कॅरीमिनाटीचा व्हिडिओ रेकॉर्ड ब्रेक ठरला. नंतर तो युट्यूबने हटविल्यावर तर हे युद्ध अजूनच चिघळले. त्यात पोरं पार पेटली. टिकटॉकची रेटिंग्ज पार खाली आणली गेली. ती टिकटॉकने कशीबशी पुन्हा वर आणली आणि देशभरात टिकटॉक बॅन होणार अशी चर्चा सुरू झाली. आपले फुन्सुक वांगडू उर्फ सोनम वांगचुकनी पण टिकटॉक सोडा संदेश दिल्यावर लोकांना पुन्हा एकदा भारतेप्रेमाचं आणि चीनद्वेषाचं भरतं आलं होतं. आता एकाच वेळी टिकटॉकवाली मुले टेन्शनमध्ये, तर टिकटॉक विरोधातली लोक खुशीत होती. आणि आता थेट सरकारनेच टिकटॉकवर खाते उघडल्याने सोशल मिडिया पुन्हा एकदा पेटला आहे.

लोकांच्या क्रिएटीव्हिटीला नेहमीप्रमाणे धुमारे फुटले आहेत. अनेकांनी मीम्स आणि ट्विट्सच्या माध्यमातून सरकारला कानपिचक्या मारल्या आहेत. आतापर्यंत या अकाउंटला 6.4 मिलियन लाईक्स देखील आले आहेत. या अकाऊंटवरून कोरोनाबद्दल जनजागृती तसेच योगाबद्दल माहिती देण्यात येत असते.
बायकॉट चायना हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला तसा लोकांनी लायनीत सगळे चायनीज ऍप्स डिलीट केले. अशावेळी भारत सरकारने टिकटॉकवर येणे हे लोकांना चांगलेच खटकलेले दिसत आहे.