शेअर मार्केटची किचकट माहिती सहजसोप्या मराठीत सांगणाऱ्या आजी भाग्यश्री पाठक!!

लिस्टिकल
शेअर मार्केटची किचकट माहिती सहजसोप्या मराठीत सांगणाऱ्या आजी भाग्यश्री पाठक!!

आधी लोकांना वाटायचं हे सोशल मिडिया वगैरे फक्त तरूणांसाठी आहे. मग दिवसभर काय ते पोस्ट, लाईक्स, कमेंट्समध्ये पडीक असतात म्हणून त्यांना टोमणे मारले जायचे. आता लहान-मोठे सगळेच फेसबुक, इन्स्टा, व्हाटस्ॲपवर असतात. तरीही युट्यूबर असणं, कंटेट क्रिएटर असणं हे अजूनही तरूणांचं क्षेत्र मानलं जातं. या समजाला धक्का देणारी काही उदाहरणं समोर येतात तेव्हा आपल्याला छान धक्का मिळतो. आजचा धक्का देणार आहेत एक साठी पार केलेल्या आजी. आता आजी म्हटल्यावर असेल पाककृतींचं चॅनेल असं वाटत असेल तर थांबाच. या आजी शिकवतात चक्क स्टॉक मार्केट!! वाचा तर मग या आजींबद्दल.

या आजींचं नाव आहे भाग्यश्री पाठक! उतारवयात साठीनंतर एखाद्या गृहिणीला सांसारिक जबाबदरीपासून थोडी उसंत मिळते. मन रमवण्यासाठी ती काही छंद जोपासते, ट्रीप करते, तब्येतीची काळजी घेते. पण ६५ वर्षांच्या भाग्यश्री पाठक यांची स्वप्नं वेगळी आहेत. त्यांचं नाव तुम्हाला फारसं माहीत नसेल. यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे आणि त्या ट्रेडिंग आणि गुंतवणुकीबद्दल माहिती देतात. रोजच्या स्टॉक मार्केटबद्दलची वित्तंबतमी त्या मराठीत सोप्या भाषेत सर्वांना सांगतात. "मार्केट आणि मी" या चॅनलचे वर्षभरात तब्बल ९०.९ k फॉलोवर्स बनले आहेत. या यूट्यूबर आजीचे मार्केटमधले ज्ञान पाहून भले भले थक्क झाले आहेत.

त्यांनी आजवर अनेक व्हिडिओ नियमित अपलोड केले आहेत. गोंधळलेल्या गुंतवणूकदारांना त्या योग्य मार्गदर्शन करतात. विशेष म्हणजे त्यांचा ब्लॉग ही आहे. www.marketaanime.com या ब्लॉगवर त्या नियमित लिहितात. मार्केटविषयी सर्व अवघड संकल्पना त्या मराठीत समजावून सांगतात. या वयातल्या त्यांचा उत्साह पाहून अनेक तरुण त्यांचे फॅन झाले आहेत.

शेयर मार्केटसारखा अवघड विषय समजण्यासाठी आणि ट्रेंडमध्ये राहण्यासाठीही रोजचा अभ्यास महत्वाचा असतो. भाग्यश्रीजी यांना २००० पासूनच या विषयात रस होता. स्वतः अभ्यास करून त्यांनी यामध्ये गुंतवणूक सुरू केली. मुलं लहान असल्याने त्यांनी गरोदरपणात नोकरी सोडली. चाळिशी झाल्यावर त्यांनी शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला. त्यावेळेस ऑनलाइन ट्रेडिंगची संकल्पनाच नव्हती. त्यामुळे त्या ब्रोकर ऑफिसमध्ये जाऊन गुंतवणूक आणि ट्रेडिंगबद्दल जाणून घ्यायच्या. हळूहळू त्यांनी सर्व शिकून घेतले आणि इतरांनाही गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करणे सुरू केले. हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून त्यांनी दोन पुस्तकेही लिहिली आहेत.

२०२० मध्ये जेव्हा सर्व काही ठप्प झाले. नोकरी, व्यवसाय यांना ब्रेक लागला. लोकांना पैशांची गरज भासू लागली. लोकांना पैशांचा ओघ उपलब्ध करून देणारे पर्याय शोधावे लागले. तेव्हा बहुसंख्य लोक स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकडे वळले. पण बाजाराची समज ही प्रत्येकाला वाटते तेवढी सोपी नसते. बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सगळेजण डीमॅट खाते उघडतात एवढे माहीत असते, पण पुढे काय करायचे याची कल्पना नसते. मराठीत तितकीशी माहितीही उपलब्ध नव्हती. याच वेळी भाग्यश्री पाठक यांनी मराठीत यूट्यूब चॅनलद्वारे याची माहिती देण्यास सुरुवात केली. त्यांचा १५ वर्षांचा अभ्यास इथे खूप फायदेशीर झाला. नियमितपणे त्या व्हिडिओ आणि ब्लॉग अपडेट करत राहिल्या. लोकांना शेअर मार्केटच्या किचकट संकल्पना सोप्या आणि सहज समजण्यायोग्य सांगितल्याने त्यांना प्रतिसादही चांगला मिळाला.

यूट्यूब चॅनल चालवणे वाटते तितके सोपे नाही. त्यासाठी आधी अभ्यास करावा लागतो, वेळेचे नियोजन करावे लागते. भाग्यश्रीजी दिवसातले १२ तास काम करतात.
त्यांचा दिवस सकाळी ७ वाजता सुरू होतो. सर्वात आधी आणि टीव्ही लावून त्या शेयर बाजारातील सर्व अपडेट्स घेतात. शेअर बाजारातील घडामोडींची अधिक माहिती मिळवण्यासाठी त्या इंटरनेट सर्फिंग करतात. दुपारी ३:३० वाजेपर्यंत टीव्ही, इंटरनेट, पुस्तके बघून त्या नोट्स काढतात. नंतर त्या ब्लॉगवर काम करतात. त्यांच्या पतीच्या मदतीने त्या पोस्ट लिहून शेअर करतात. नंतर संध्याकाळी एकदा बाजार बंद झाला की त्या व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी तयारी करतात. दररोज १०-१५ मिनिटांचा व्हिडिओ करून त्या पोस्ट करून माहिती देतात. त्यांचा हा आवडता विषय असल्याने त्यांना कधी कंटाळा येत नाही. मुलगा परदेशी आणि मुलगी विवाहित असल्याने त्यांना बराच वेळ मिळतो. हा मिळणारा वेळ त्या वाया न घालवता सत्कारणी लावतात. यासाठी त्यांचे पतीही त्यांना मदत करतात.

वयाच्या चाळीशी पासून त्यांनी या क्षेत्रात अभ्यास आणि कमाई सुरू केली. आज मार्केटमध्ये अनेक तरुण तरुणी उतरत आहेत. मार्केट हा विषय फक्त नशिबाचा नसून अभ्यासाचा आहे. हे पाठक आजींचे म्हणणे आहे. खरचं त्यांचा उत्सहाला आणि अभ्यासाला सलाम.

शीतल दरंदळे